Shivani Surve on husband Ajinkya Nanaware: कलाकार विविध भूमिकांमधून, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग असतो. कलाकारांच्या जीवनशैलीबद्दल, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांना जाणून घ्यायचे असते. कलाकारही त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, विविध मुलाखतींमधून विविध गोष्टी शेअर करत असतात.

अभिनेत्री शिवानी सुर्वेला ‘देवयानी’ मालिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती ‘बिग बॉस’मध्येदेखील सहभागी झाली होती. काही चित्रपटांमध्येदेखील शिवानी सुर्वेने काम केले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती.

“लग्नाचा योग्य निर्णय होता…”

आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या पतीबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वेने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या पतीबद्दल म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरेबद्दल वक्तव्य केलं. ती म्हणाली, “लग्नाचा योग्य निर्णय होता, तो योग्य वेळीसुद्धा घेतला. आम्ही आठ वर्षे एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.”

पती अजिंक्यबद्दल शिवानी पुढे म्हणाली, “अजिंक्य असा माणूस आहे की तो खूप शांत आहे. मला जेव्हा त्याची गरज असते, तेव्हा तो तिथे असतो. मला जेव्हा त्याची गरज असते तेव्हा मी त्याला सांगते की अमुक अशा गोष्टींमध्ये मला तुझी गरज आहे आणि हे तू मला करून दे. तेव्हा तो येतो. त्याआधी तो काहीही करायला जात नाही. त्याचं म्हणणं असं असतं की तू कर, तू एवढी वर्ष करत आली आहेस. तुला वाटलं की तुला माझी कशात मदत होऊ शकते, तेव्हा मी त्या गोष्टी करेन.”

पुढे ती हसत म्हणाली की, मी कायम म्हणते की मी ग्रीन फ्लॅग मुलगा मागितला होता, एवढा ग्रीन फ्लॅग दिला की मी त्याच्या समोर रेड फ्लॅग वाटायला लागले.

जेव्हा नवरा बायको एकाच क्षेत्रात काम करत असतात त्यावेळी असं होऊ शकतं की एकाला जास्त प्रोजेक्ट येतात आणि एकाला काम तितक्या प्रमाणात मिळत नाही, त्यावेळी तुम्ही ते त्याचा कसा समतोल साधता? त्यावर शिवानी म्हणाली, “यासाठी प्लॅनिंगची गरज लागते. त्या गोष्टी मी प्लॅन करते. मी स्मार्टपणे गोष्टी हँडल करते. एक व्यक्ती एका गोष्टीत उत्तम असेल तर दुसऱ्या व्यक्ती दुसऱ्या गोष्टीत उत्तम आहे. त्यामुळे अजिंक्यचा शांतपणा खूप मदत करतो. त्याच्यामुळे गोष्टी खूप सोप्या होतात.”

दरम्यान, अजिंक्यच्या कामाबद्दल बोलायचे तर तो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे. तर शिवानी आता आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.