Shivani Surve on career’s biggest mistake: अभिनेत्री शिवानी सुर्वे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील मानसी या भूमिकेतून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. लवकरच ती ‘ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता शिवानीनं केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. तिनं काही दिवसांपूर्वी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला विचारलं की, करिअरच्या प्रवासात असा कोणता निर्णय आहे, ज्याचा तुला पश्चात्ताप आहे, असं वाटतं आणि असा कोणता निर्णय आहे, तो बरोबर आहे, असं वाटतं?

“माझ्या करिअरमधील चुकीचा निर्णय…”

या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “कधी कधी निर्णय चुकतात. एक रिअॅलिटी शो करणं हा माझ्या करिअरमधील चुकीचा निर्णय होता. जिथे तुम्हाला माहीत नसतं की, तुम्हाला कसं दाखवलं जाणार आहे. त्या २४ तासांमध्ये तुम्ही कायम रागात, क्रोधात नसता.”

“तुम्ही वेगवेगळ्या मूडमध्ये असतात; पण तो स्मार्ट पद्धतीनं डिझाईन केलेला शो आहे. तुमची प्रतिमा बाहेर काय दिसणार आहे, हे निर्माते ठरवतात. अर्थातच माईंड गेम असल्यानं मानसिकरीत्या तुमच्याशी खेळतात. एका घरात एखाद्या टास्कमध्ये कोणाबद्दल बोलायचं आहे, तर ती भांडणं होतात. त्यातून वादावादी होते.”

“मला असं वाटतं की, त्या निर्णयाचा मला पश्चात्ताप होतो. त्यानंतर काही वर्षं मला ते स्वीकारायचंदेखील नव्हतं की, मी असं काही काम केलं आहे. मला असं वाटायचं की, काही चमत्कार व्हावा आणि लोकांनी ते विसरून जावं; पण आता मी स्वीकारायला शिकले आहे. ठीक आहे, ती चूक होती आणि ती खूप मोठी चूक होती,” असे म्हणत अभिनेत्रीनं तिच्या भावना व्यक्त केल्या.

पुन्हा प्रेक्षकांशी जोडण्यासाठी तू काय प्रयत्न केलेस? यावर ती म्हणाली, “मला कोणाला काहीही स्पष्टीकरण द्यावंसं वाटत नाही किंवा मी कशी आहे, मी किती चांगली आहे, हे सांगावंसं वाटत नाही. कारण- ज्या माणसांना माहीत आहे की, मी खरी कशी आहे, ते माझ्याबरोबर आहेत. माझ्यासाठी तेच लोक महत्त्वाचे आहेत.”

दरम्यान, शिवानी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. तसेच, अभिनेत्रीने देवयानी, ट्रिपल सीट, वाळवी, सातारचा सलमान, झिम्मा २, अशा मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.