टीव्हीवरील लोकप्रिय जोडी वेगळी झाली आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असताना अभिनेत्याने ब्रेकअपची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने ब्रेकअपची पोस्ट करून नंतर डिलीट केली. पण त्याच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल झाला आहे. ब्रेकअप कधी झालंय, तेही अभिनेत्याने सांगितलं आहे.
‘बिग बॉस’ फेम लोकप्रिय अभिनेता कुशाल टंडन व अभिनेत्री शिवांगी जोशी रिलेशनशिपमध्ये होते. काही महिन्यांपूर्वी खुद्द कुशाल टंडनने प्रेमात असल्याची कबुली दिली होती. दोघांनी ‘बरसातें’ मालिकेत एकत्र काम केलं होतं, तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू होती. त्यानंतर कुशालने शिवांगीच्या वाढदिवशी खास पोस्ट केली होती. मग एका मुलाखतीत कुशालने त्याच्यासाठी मुलगी शोधण्याचा त्याच्या पालकांचा शोध अखेर संपला आहे, असं म्हटलं होतं. पण आता जोडप्याचं ब्रेकअप झालं आहे.
कुशाल टंडनची पोस्ट नेमकी काय?
“माझं प्रेम असलेल्या सर्व लोकांना मला फक्त एवढंच सांगायचंय की, मी आणि शिवांगी आता एकत्र नाही. आणि हो या गोष्टीला ५ महिने झाले आहेत,” असं कुशालने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं. ही स्टोरी त्याने काही वेळाने डिलीट केली.

दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. कुशालने ब्रेकअपची घोषणा केल्यानंतरही चाहते गोंधळले आहेत. कारण कुशालने पाच महिन्यांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलंय; पण शिवांगीने या वर्षी २८ मार्च रोजी त्याच्यासाठी वाढदिवसानिमित्त एक पोस्ट केली होती.
कुशाल व शिवांगी एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्यावर त्यांना वयातील अंतरामुळे ट्रोल केलं गेलं. शिवांगी २७ वर्षांची आहे, तर कुशाल ४० वर्षांचा आहे. दोघांच्या वयात १३ वर्षांचे अंतर आहे.
मी प्रेमात आहे, कुशाल टंडनने दिलेली कबुली
ऑक्टोबर २०२४ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कुशालने शिवांगीच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती. तसेच त्याच्यासाठी मुलगी शोधण्याचा त्याच्या पालकांचा शोध अखेर संपलाय, असंही त्याने म्हटलं होतं. “मी आता लग्न करत नाहीये, पण मी प्रेमात नक्कीच आहे. मी हे नातं हळूहळू पुढे नेत आहे,” असं कुशाल म्हणाला होता.
कुशालने सांगितलं होतं की त्याने लग्न लवकर करावं अशी त्याच्या आईची इच्छा आहे. “माझ्या आईला माझं लग्न होताना पाहायचं आहे. खरं तर तिच्या हातात असतं तर तिने माझं लग्न आजच लावलं असतं. केव्हाही काहीही होऊ शकतं. मात्र सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझ्यासाठी चांगली मुलगी शोधण्यासाठी माझ्या आई-वडिलांचा शोध आता संपला आहे,” असं कुशाल म्हणाला होता.
कुशाल व शिवांगीच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच या दोघांचं ब्रेकअप झाल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कुशालने ब्रेकअपची घोषणा केली असली तरी शिवांगीने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.