अभिनेत्री श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात विविध धाटणीच्या भूमिका करत प्रेक्षकांचे मन जिंकले. या शोनंतर ती ड्रामा ज्युनिअर्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसली. अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे हे या कार्यक्रमाचे परीक्षक होते. या कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र, श्रेया बुगडे तिने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
श्रेया बुगडे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींविषयी म्हणाली, “ती खूप प्रेमळ…”
अभिनेत्री श्रेया बुगडेने नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला उषा नाडकर्णी यांची मिमिक्री करण्यासाठी सांगितले, त्यावेळी श्रेयाने मिमिक्री करण्याआधी उषा नाडकर्णी यांच्याबद्दल म्हटले, “आऊचं विशेष प्रेम आहे माझ्यावर आणि मलासुद्धा ती खूप आवडते. खरंतर सगळे तिला खूप घाबरतात. सुरुवातीला माझ्या डोक्यातसुद्धा तिची प्रतिमा तशीच होती, पण ती खूप प्रेमळ आहे, मनाने प्रचंड निर्मळ आहे. मी तिची मिमिक्री करण्याची हिंमत केली. सगळ्यांनी मला म्हटलंदेखील की याला हिंमतच म्हटले पाहिजे. आता तिच्यासमोरदेखील बऱ्याचदा तिची मिमिक्री करण्याची वेळ आली, ती मी मनात भीती बाळगूनच करत असते”, असे श्रेयाने म्हटले आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात श्रेया अनेकांची मिमिक्री करताना दिसली होती. प्रेक्षकांना ते आवडल्याचेदेखील पाहायला मिळाले होते. उषा नाडकर्णी, ज्यांना आऊ म्हणून ओळखले जाते, त्यांची मिमिक्री विशेष गाजली. याबरोबरच श्रेयाने पत्रकार बरखा दत्त यांचीदेखील मिमिक्री केली होती. याविषयी बोलताना ते माझे आवडते पात्र होते, असे श्रेयाने म्हटले आहे.
हेही वाचा: लवकरच सोभिता धुलिपाला नागार्जुनच्या घरची होणार सून, लग्नाआधीच्या समारंभाला झाली सुरुवात
याबरोबरच, मी एखादी विनोदी भूमिका साकारावी, काम करावं अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. कधीतरी तुला विनोदी भूमिका मिळायला पाहिजे, असं आई म्हणायची, अशी आठवणदेखील श्रेयाने या मुलाखतीत सांगितली आहे.
दरम्यान, श्रेया बुगडेच्या कामाबाबतीत बोलायचे तर ‘बैरी पिया’, ‘थोडा है बस थोडे की जरूरत है’, अशा हिंदी मालिकेत तिने काम केले आहे. ‘एकाच ह्या जन्मी जणू’, ‘तू तिथे मी’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘फू बाई फू’, अशा विविध मालिका आणि कार्यक्रमांतून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.