ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी आपल्या करिअरमध्ये ५०० हून अधिक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ‘फर्ज’, ‘बॉबी’, ‘फकिरा’ अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटांसह त्यांनी मराठी मनोरंजनसृष्टीत सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आजवर त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. नुकतीच त्यांनी ‘इंडियन आयडल’च्या मंचावर उपस्थिती लावली होती. यावेळी या ज्येष्ठ अभिनेत्रींनी सुपरहिट मराठी गाण्यांवर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.
‘इंडियन आयडल’ हा सिंगिंग शो गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या या कार्यक्रमाचं १६ वं पर्व सुरू आहे. श्रेया घोषाल या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी नुकत्याच प्रमुख पाहुण्या म्हणून या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी श्रेयाने मराठमोळी स्पर्धक अंशिका चोणकर हिच्या सोबतीने काही मराठी गाणी गायली. या गाण्यावर अरुणा इराणींनी जबरदस्त डान्स केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
यातील एका व्हिडीओमध्ये श्रेया “रेशमाच्या रेघांनी…” ही सदाबहार लावणी गात असल्याचं पाहायला मिळत आहे. ही मूळ लावणी प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायली आहे. श्रेया व अंशिका यांनी शोमध्ये ही लावणी गाताच अरुणा इराणींनी सुंदर डान्स केला. तर, श्रेयाने दुसरी लावणी गायली ती म्हणजे “चंद्रा…” हे गाणं तिने स्वत: गायलेलं असून याला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमातील या “चंद्रा…” लावणीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.
मूळ सिनेमात ‘चंद्रा’ गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर थिरकली आहे. अरुणा इराणींचा जबरदस्त डान्स आणि श्रेयाचा परफॉर्मन्स पाहून या व्हिडीओवर अमृताने “Queen…” अशी कमेंट केली आहे.
सध्या अरुणा इराणींच्या या डान्स व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अरुणा इराणी आता जवळपास ७९ वर्षांच्या आहेत. या वयात त्यांची एनर्जी तरुणपिढीला लाजवेल अशी आहे. त्यांच्या नृत्याचं, एक्स्प्रेशन्सचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
