‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मराठी मालिकाविश्वातील अशा लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे जिने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतरही तिची क्रेझ काही कमी झाली नाही. आता या मालिकेला प्रदर्शित होऊन २५ वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मोठी पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत होते. त्यांनी साकारलेली आबांची भूमिका त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाली होती.

केदार शिंदेंनी दिला आठवणींना उजाळा

केदार शिंदे यांनी आता इन्स्टाग्रामवर मालिकेला प्रदर्शित होऊन २५ वर्षे झाल्यानिमित्ताने पोस्ट शेअर करत या मालिकेने त्यांना खूप काही दिलं. १७५ भागांनंतर मालिका थांबवली होती मात्र तरी प्रेक्षकांचं तिच्यावरचं प्रेम कमी झालं नाही असं म्हटलं आहे. यामधून ते म्हणाले, “आजच्या दिवशीच टिपरे मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. २५ वर्षे झाली या ऐतिहासिक गोष्टीला! या मालिकेने वैयक्तिक स्तरावर मला खूप काही दिलं. १७५ भाग पूर्ण होऊन ती मालिका आम्ही थांबवली, पण आजही ती रसिकांच्या मनात घर करून आहे. कमी वेळा असं काही घडतं. कलाकृती आपलं नशीब घेऊन जन्माला येते, पण या मालिकेने मला दिग्दर्शक म्हणून जन्म दिला. पंचवीस वर्षे हा खरतर मोठा कालखंड आहे. काल प्रदर्शीत झालेल्या मालिकेचा प्रभाव आज रहात नाही, पण याने कित्येक पिढ्या तो प्रभाव तसाच ठेवलाय.”

केदार शिंदे पुढे म्हणाले, “दिलीप प्रभावळकर यांनी मला पहिला भाग होण्याआधी विचारलं की, शेवटचा भाग कितवा असणार आहे? तेव्हा महिन्यातून चारच भाग टिव्हीवर यायचे. मी म्हणालो, १७५!!! आणि ती थांबवलीही तेव्हाच. कधी संपणार पेक्षा, का संपवलीत? हा प्रश्न फार मोलाचा आहे. जो आजही तुम्ही भेटल्यावर विचारता. तुम्हाला मनापासून धन्यवाद.. तुम्ही चोखंदळ होतात म्हणून ही मालिका सादर होऊ शकली! आता पुन्हा एकदा वाट पाहू पुढच्या वर्षांची!! पन्नाशीला नक्कीच लोकं तोच प्रश्न विचारतील, का हो बंद केलीत एवढी सुंदर मालिका?”

केदार शिंदेंच्या या मालिकेत दिलीप प्रभावळकर यांच्यासह या मालिकेत अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी त्यांच्या सुनेची, राजन भिसे यांनी त्यांच्या मुलाची, विकास कदम यांनी त्यांच्या नातवाची, रेश्मा नाइकने त्यांच्या नातीची भूमिका साकारली होती. या मालिकेतील पात्र अनेकांना आजही आठवतात.

झी मराठीवर गेल्या २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. आजही या मालिकेचे भाग प्रेक्षक यूट्यूबवर पुन्हा पुन्हा पाहत असतात. त्यामुळे आजही या मालिकेची क्रेझ कायम असल्याचं पाहायला मिळतं.