कलावंत ढोल ताशा पथकाकडून दरवर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणुकांमध्ये संचलन व वादन सादर केलं जातं. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी एकत्र येऊन या पथकाची स्थापना २०१४ मध्ये केली होती. आजच्या घडीला या पथकासह अनेक लोकप्रिय कलाकार जोडले गेले आहेत. सौरभ गोखले, श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित अशा अनेक कलाकारांचे ढोलवादनाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर यंदाही व्हायरल झाले आहेत. यासंदर्भात ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशींनी शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विद्याधर जोशींची पोस्ट

एक आपली उत्सुकता…
१. हे पुण्यातल्या कलाकार पथकातले कलाकार विसर्जनाच्या मिरवणुकीत एकूण किती वेळ ‘वादन’ करतात??
२. ज्या जोशाने ते रिल्स मध्ये वाजवताना दिसतात तितक्याच जोशात ते सतत ‘वादन’ करतात का?

विद्याधर जोशींच्या या पोस्टवर अभिनेत्री श्रुती मराठेने कमेंट करत स्पष्ट उत्तर दिलं आहे.

श्रुती मराठेचं उत्तर

श्रुती मराठे लिहिते, “बाप्पा…दीड महिना सराव, ११ दिवसांत १४ वेळा वादन आणि शेवटच्या दिवशी जवळपास साडेसात तासांची विसर्जन मिरवणूक एवढं आम्ही करतो. कारण, आम्हाला वादन करायला मनापासून आवडतं. बाकी आमच्या वादनाची शंका असेल, तर पुढच्या वर्षी जरुर या एक दिवस तरी बघायला. तुमचे सगळे प्रश्न सुटतील. घरी बसून फेसबूकवर टाकून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत बाप्पा. जे लोक आम्हाला लाइव्ह बघतात ते असे प्रश्न फेसबूकवर टाकत नाहीत.”

श्रुतीच्या उत्तरावर बाप्पा जोशी म्हणाले…

“श्रुती तुझ्या पहिल्या तीन ओळीत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं धन्यवाद. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. प्रत्यक्ष येऊन बघायची काहीही गरज नाही…आणि तसेही मला येऊन बघण्यापेक्षा कदाचित वाजवणं आवडेल. कारण वाजवणाऱ्याला त्रास होत नाही.. बघणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला तो जास्त होतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुला किंवा इतरांना फक्त रील मध्ये बघितल्यामुळे प्रश्न पडले. प्रत्यक्ष बघितलं नाही हे खरंच आहे… पण एफबी वरती प्रश्न विचारून तू माझ्या प्रश्नाला उत्तर दिलंस याबद्दल तुझे शतशः आभार. तुला माझा राग आला असेल तर ते योग्यच आहे.”

अभिजीत केळकरची कमेंट

बाप्पा, यातल्या एकाही कलाकाराला तू ओळखत नाहीस का? तुझ्याकडे त्यांचे नंबर्स नाहीयेत का? आणि “पुण्यातले” , “मुंबईतले” कलाकार म्हणजे काय असतं? आणि तुला एवढ्या Genuinely हे प्रश्न पडले असते तर त्यांच्यापैकी कोणालाही फोन करूनही तू हे विचारू शकला असतास किंवा प्रत्यक्ष जाऊनही पाहू शकला असतास… तू बसल्या-बसल्या उगाच उंगल्या करतोस, त्यातून तुला काय साध्य करायचं आहे तुलाच माहीत पण एकंदरीतच, हल्ली नेहमीच उगाच negative बोलतोस… आता यावर माझ्याशी बोलायला अजिबात फोन करू नकोस, मला तुझा राग आलाय.

Vidyadhar Joshi Shruti Marathe Post
विद्याधर जोशींच्या पोस्टवर श्रुतीची कमेंट

दरम्यान, विद्याधर जोशींच्या या पोस्टवर मनोरंजन विश्वातील अन्य काही कलाकारांनी सुद्धा आपली मतं मांडत, श्रुतीच्या भूमिकेशी सहमती दर्शवली आहे.