Shruti Marathe on Saurabh Gokhale: २०१२ ला प्रदर्शित झालेल्या राधा ही बावरी या मालिकेतील या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. जवळजवळ दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मालिकेत राधा ही भूमिका अभिनेत्री श्रुती मराठेने साकारली होती; तर सौरभच्या भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले होता.

मालिका संपल्यानंतरही विविध मुलाखती, तसेच कलावंत ढोल-ताशा पथक या माध्यमातून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येतात. श्रुती व सौरभने काही दिवसांपूर्वी राजश्री मराठी या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मालिकेच्या सेटवरील अनेक किस्से सांगितले. त्यांच्यातील भांडणाबद्दल सांगितले. तसेच, ते एकमेकांशी आठवडाभर का बोलत नव्हते याबद्दलही त्यांनी खुलासा केला.

“आमचा एक रोमँटिक सीन…”

मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तुमच्यातलं कोणतं भांडण तुम्हाला आठवतंय? त्यावर श्रुती म्हणाली, “मला दोन गोष्टी आठवत आहेत. एक तर सौरभला खूप लवकर राग येतो. त्याला राग आला की, त्या रागामध्येच तो असे काही निर्णय घेतो की, त्याचा नंतर त्याला पश्चात्ताप होत असेल.”

Award Banner

अभिनेत्री पुढे म्हणाली, “राधा ही बावरी या मालिकेच्या वेळी आणि आतासुद्धा कलावंत पथकामध्ये एकत्र असतानासुद्धा मला हा अनुभव येतो. भांडण होत नाही; पण मला असं होतं की, आता शांत हो. कळलं की, तू चिडला आहेस. तू शांत हो, असं मला वाटत असतं.”

‘राधा ही बावरी’च्या एका सीनदरम्यान काय घडले होते, हे सांगत श्रुती म्हणाली, “राधा ही बावरी मालिकेच्या शूटिंगवेळी माझ्या पायाच्या करंगळीला लागलं होतं. रक्त येत होतं, जखम झाली होती. तेव्हा तो मोठे बूट घालायचा. तर आमचा एक रोमँटिक सीन होता. जिथे आम्ही असे जवळ येतो आणि तो माझे गाल पकडतो. तर त्यानं त्या सीनच्या शूटिंगदरम्यान त्याचा पाय माझ्या पायावर दिला. जिथे लागलं होतं. तेव्हा मी त्याला जोरात ढकललं होतं. मला असं वाटलेलं की, पुढचे काही दिवस तू माझ्याशी बोलूच नकोस.”

सौरभचा आणखी एक किस्सा सांगत अभिनेत्री म्हणाली, “मला त्याचा आणखी एक किस्सा आठवतोय. साडेआठचा कॉल टाईम असायचा. ९ ची शिफ्टची असायची. ९ वाजून १० मिनिटांपर्यंत आम्ही शूटिंगला सुरुवात करायचो. तो मुलगा असल्यानं त्याचं लवकर आवरायचं. तर त्याच्यापासून शूटिंगला सुरुवात व्हायची. तर एक-दोन दिवस असं झालं की, त्याला यायला उशीर झाला. त्यामुळे सव्वानऊ की ९.२० ला शूटिंग सुरू झालं. मग, त्यावरून चर्चा झाली की, तू वेळेत का येत नाहीस वगैरे. त्यानंतर तो चिडला. दुसऱ्या दिवसापासून तो पुढचे आठ दिवस सव्वाआठ वाजता सेटवर आला होता. त्याची काहीच गरज नव्हती. कारण- इतर सगळे ९ वाजताच येणार आहेत. पण, राग आल्यानंतर त्यानं तो निर्णय घेतला होता. त्यानं ते आठवडाभर केलं. त्यानंतर तो शांत झाला, आम्ही शांत झालो, सगळे शांत झाले. त्यानंतर तो ९ वाजता यायला लागला.”

दरम्यान, श्रुती याच मुलाखतीत असेही म्हणाली की, मी एकाच वेळी विविध गोष्टी करत होते. मालिकेचे शूटिंग सुरू होते. त्याच वेळी मी एक डान्स रिअॅलिटी शो करत होते. त्या तीन महिन्यांत मी खूप थकत असे. त्यामुळे माझी चिडचिड व्हायची. तेव्हा मी त्याच्यावर बऱ्यापैकी राग काढला आहे. त्यानं तो सोसला आहे. मी त्याला खूप त्रास दिला आहे. तेव्हा त्यानं मला सांभाळलं आहे. तेव्हापासून आमच्यात चांगली बॉण्डिंग झाली.