Marathi Actress New Car : आपलं हक्काचं घर आणि गाडी असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यंदाच्या वर्षी मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक लोकप्रिय कलाकारांनी नवीन अन् आपल्या आवडीच्या गाड्या खरेदी केल्या. तर काहींच्या घरात हक्काच्या पहिल्या गाडीचं आगमन झालं. पहिली गाडी ही प्रत्येकासाठी स्पेशल असते. आरामदायी प्रवास व्हावा, कुठेही मनासारखं फिरता यावं यासाठी सगळ्यांनाच हक्काची गाडी हवी असते. मालिकाविश्वात काम करणाऱ्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचं स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झालं आहे.

झी मराठीच्या ‘शुभ श्रावणी’ मालिकेत शुभंकरच्या बहिणीची शोभाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कोमल शेटेने नुकतीच गाडी खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी तिने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सर्वांना सांगितली आहे.

कोमलने यापूर्वी सुद्धा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकांमध्ये ती झळकली आहे.

आता कोमलने नुकतीच तिच्या आयुष्यातली पहिली फोर व्हिलर गाडी खरेदी केली आहे. यावेळी तिचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. कोमलच्या आईने नव्या गाडीची पूजा केली. घरात गाडीचं आगमन झाल्यावर अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. नवीन गाडी घेतल्यावर अभिनेत्री तिच्या कुटुंबासह शिर्डीला पोहोचली. श्री साईबाबा मंदिर परिसरातील काही सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत.

कोमल लिहिते, “आमची पहिली फोर व्हिलर गाडी…एका लहानशा सायकलवर एकत्र फिरणाऱ्या त्या दोन मुलांना कल्पनाही नव्हती की एक दिवस ते स्वतःच्या गाडीच्या चाव्या हातात घेऊन…गाडीच्या बाजूला असे आनंदात उभे राहतील! असंख्य रोड ट्रिप्स, मोठ्या आवाजात गाणी ऐकणं यासाठी तयार होऊयात…” अभिनेत्रीने मारुती सुझुकी बलेनो गाडी खरेदी केली आहे. यानिमित्ताने कोमलचं सर्वात मोठं मॅनिफेस्टेशन पूर्ण झालं आहे.

नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. याशिवाय मराठी कलाकारांनी अन् मालिकेतील सहकलाकारांनी कोमलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कोमल महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असलेली ‘शुभ श्रावणी; मालिका झी मराठीवर रोज सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाते.