Shubh Shravani Fame Sumit Patil: गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर ‘शुभ श्रावणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत श्रावणी सतत कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत असल्याचे पाहायला मिळते.

श्रावणीला संकटातून बाहेर काढणारी, तिला वेळोवेळी मदत करणारी काही माणसं तिच्या आजुबाजूला पाहायला मिळतात. त्यामध्ये शुंभकरचे नाव अग्रक्रमाने येते.

मध्यमवर्गीय कुटुंबातील, घराच्या जबाबदाऱ्या खांद्यावर असणारा, प्रेमळ, प्रमाणिक, हुशार हा शुंभकर सर्वांची मने जिंकतो. शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्केंचा तो खास माणूस आहे.

शुभंकर त्याच्या आई- वडिलांबरोबर आणि बहिणींसोबत राहतो. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं असलं तरी तिला सासरी हुंड्यासाठी त्रास सहन करावा लागतो, तर लहान बहीण कॉलेजमध्ये शिकणारी, शिक्षणासाठी झटणारी आहे. वडील रिक्षाचालक असले तरी त्यांचा रिक्षा चालवण्यात फारसा रस नाही; त्यांना ज्योतिषशास्त्राची आवड असून अचानक श्रीमंत होण्याचं एक वेगळंच स्वप्न आहे. या सगळ्या परिस्थितीत शुभंकरसाठी सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची आई आहे.शुंभकरच्या आईला माहित आहे की तो मनाने अत्यंत शुद्ध आहे.घरासाठी आणि बहिणींसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतो.

तो कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या शिक्षणमंत्र्यांकडे काम करतो. साहेबांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो त्यांच्यासाठी अत्यंत इमानदारीने काम करतो. त्याच्यासाठी साहेब म्हणजे देव, आणि त्यांचं घर म्हणजे मंदिर आहे. साहेबांची मुलगी आणि त्यांच्यात एक वेगळी वैयक्तिक कथा आहे. साहेब जरी तिला दुर्लक्षित करत असले, तरी शुभंकर तिच्याशी सौम्यपणे वागतो, तिची काळजी घेतो , साहेबांची मुलगी म्हणून तिच्याविषयी आदर राखतो.

मुळात घरच्या जबाबदाऱ्या, नोकरी, साहेबांची कामं, बहिणींचं भविष्य आणि कोणाचंही मन न दुखावण्याची वृत्ती यामुळे शुभंकरची तारेवरची कसरत होत असल्याचे पाहायला मिळते.

सुमित पाटील म्हणाला…

शुभंकर ही भूमिका अभिनेता सुमित पाटीलने साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याची कशी निवड झाली. याबद्दल मराठी सिरिअल्स ऑफिशिअल्सबरोबर बोलताना तोम्हणाला, “मी ‘विषय हार्ड’ हा सिनेमा केला होता, जो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. त्यानंतर झी टॉकीजच्या ओरिजिनल सेगमेंटमधून मला कॉल आला आणि ‘पक्या पिंकीज साहेब’ हा चित्रपट मी झी टॉकीजबरोबर केला.

पुढे तो म्हणाला, “त्यानंतर झी मराठीकडून मला विचारण्यात आलं की, कोल्हापूरचीच एक सिरीयल करशील का? तेव्हा मला वाटलं आपल्याच घरच्या मातीतील पात्र साकारायला मिळणं हे नशीब आहे. पात्र आव्हानात्मक वाटले, पण तितकाच आकर्षकही वाटले. ऑडिशन्स पाठवल्यानंतर वल्लरीबरोबर स्क्रीन टेस्ट, लुक टेस्ट झाली. झी मराठी आणि सोल प्रोडक्शन्सला ते आवडलं आणि संपूर्ण प्रक्रियेनंतर मी ही भूमिका स्वीकारली.”

दरम्यान, मालिकेत सतत कोणते ना कोणते ट्विस्ट येताना दिसतात. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.