‘झी मराठी’ वाहिनीवर १९ जानेवारी २०२६ पासून म्हणजेच काही दिवसांपूर्वीच ‘शुभ श्रावणी’ ही नवी मालिका सुरू झाली. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री वल्लरी विराजने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. यापूर्वी ती ‘नवरी मिळे हिटलरला’ या गाजलेल्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती. तिने साकारलेली लीला सर्वांच्या मनात घर करून गेली आणि आता वल्लरी श्रावणीच्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.

विश्वंभर राजेशिर्के हे राज्याचे शिक्षणमंत्री आहेत आणि त्यांच्या मुलीचं नाव आहे श्रावणी राजेशिर्के. या बापलेकीच्या नात्यात दुरावा असल्याचं पहिल्या प्रोमोमधूनच स्पष्ट झालेलं आहे. श्रावणी नुकत्याच झालेल्या परीक्षेत फक्त ३५ टक्के मिळवून पास झालीये. विश्वंभर राजेशिर्के आपल्या मुलीचा कायम राग-राग करत असतात. आता आपल्या वडिलांची मनधरणी करायची, त्यांना अभिमान वाटावा यासाठी कायम प्रयत्न करायचे ही एकमेव इच्छा श्रावणीची असते. या सगळ्यात तिला साथ देणार असतो शुभंकर. आता मालिकेत सध्या श्रावणी तिचं शिक्षण पूर्ण करत असल्याचं पाहायला मिळत आहे पण, खऱ्या आयुष्यात वल्लरी विराजचं शिक्षण कितीये तुम्हाला माहितीये का?

अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक ‘आस्क मी सेशन’ घेतलं होतं. यात वल्लरीने तिच्या शिक्षणाबद्दल माहिती दिली होती.

वल्लरीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं, अभिनेत्री पदवीधर म्हणजेच BFM Graduate आहे. बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट्स (Bachelor of Financial Markets) या विषयात तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

“तू अभिनेत्री नसतीस तर, काय केलं असतं? अभिनयाशिवाय कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची तुझी इच्छा होती?” असा प्रश्न देखील वल्लरीला विचारण्यात आला होता. यावर वल्लरीने, “मी अभिनेत्री नसते तर निश्चितच डॉग ग्रुमर म्हणून काम केलं असतं किंवा प्राण्यांच्या संबंधित क्षेत्रातच कार्यरत असते.” असं उत्तर दिलं होतं. वल्लरीचा स्वतःचा एक छोटा व्यवसाय देखील आहे; जो प्राण्यांशी संबंधित आहे. वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलोन आहे. Bath and Barks असं तिच्या सलोनचं नाव आहे.

vallari viraj education
वल्लरी विराज

दरम्यान, वल्लरीची प्रमुख भूमिका असलेली ‘शुभ श्रावणी’ मालिका सायंकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते. यामध्ये तिच्या वडिलांची भूमिका अभिनेते लोकेश गुप्ते यांनी साकारली आहे.