Shubh Shravani Fame Actress Education : ‘शुभ श्रावणी’ ही मालिका झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे आणि या मालिकेची स्टारकास्ट अत्यंत तगडी आहे. या मालिकेतून बऱ्याच वर्षांनी लोकेश गुप्ते, आसावरी जोशी हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आहेत, तर मुख्य भूमिकेत वल्लरी विराज ही अभिनेत्री आहे. वल्लरीसह सानिका काशिकरसुद्धा आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतही वल्लरी आणि सानिका या दोघी एकत्र पाहायला मिळाल्या होत्या. ‘शुभ श्रावणी’ मालिकेतून सानिका ‘मोक्षा’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेआधी तिनं ‘मन झाला बाजिंद’, ‘पाहिले ना मी तुला’, ‘काव्यांजली’ या मालिकेतूनही तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
मालिकांबरोबरच तिने काही मराठी सिनेमे आणि ओटीटीवरील सीरिजमध्ये ही काम केलं आहे. ‘सिंगल’, ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘होय महाराजा’, ‘मनमौजी’, ‘कढीपत्ता’ यांसारख्या चित्रपटांत ती पाहायला मिळाली आहे; तर ‘गिल्टी माइंड्स’ या वेब सीरिजमुळे ती ओटीटीवरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.
अभिनयात सक्रिय असलेली सानिका शिक्षणातही तितकीच हुशार आहे. तिने इंटिरिअर डिझाइनचं शिक्षण घेतलं आहे. सोशल मीडियावरील प्रश्नोत्तरांच्या सेशनद्वारे तिने स्वत:च तिच्या शिक्षणाबद्दलचा खुलासा केला. नुकतंच चाहत्याने तिला तिच्या शिक्षणाबद्दलचा प्रश्न विचारला, यावर ती उत्तर देत म्हणाली, “मी साठ्ये कॉलेजमध्ये होते. त्यानंतर मी एल. एस. रहेजा कॉलेजमधून इंटिरिअर डिझाइनचं शिक्षण घेतलं.” अभिनेत्रीनं काही काळ व्यावसायिक इंटिरिअर डिझायनर म्हणून कामही केलं.
शिक्षणात आणि अभिनयात हुशार असलेल्या सानिकाला संगीताचीसुद्धा आवड आहे. सानिकाचं बालपण संगीत आणि कलाविश्वाने समृद्ध अशा वातावरणात गेलं. संगीतकारांच्या कुटुंबात वाढल्यामुळे तिला लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताची ओळख झाली.
सानिका आता ‘शुभ श्रावणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या मालिकेत ती मोक्षा ही भूमिका साकारत आहे. ‘शुभ श्रावणी’ मालिका सायंकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.

