Vallari Viraj Diet Tips : बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयाबरोबरच सौंदर्य आणि फिटनेसमुळेदेखील चर्चेत राहत असतात. मराठी टेलिव्हिजन विश्वातही अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या अभिनयासह फिटनेससाठी ओळखल्या जातात. अशीच लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वल्लरी विराज.
मालिकांचे शूटिंग हे बऱ्याचदा १२-१२ तास चालतं. त्यामुळे कलाकारांना या शूटिंगच्या वेळेनुसार स्वत:च्या जेवणाचं शेड्यूल ठरवावं लागतं. अभिनेत्री वल्लरी विराजसुद्धा तिच्या शूटिंगच्या वेळेनुसार स्वत:च्या जेवणाचं आणि डाएटचं शेड्यूल फॉलो करते.
वल्लरी विराजने नुकत्याच एका मुलाखतीत तिची दिनचर्या सांगितली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंतचा तिचा दिवस कसा असतो, या दिवसभरात ती काय-काय खाते, तिच्या आवडीचे पदार्थ कोणते, हे सगळं अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत वल्लरी तिची दिनचर्या सांगत म्हणाली, “सकाळी उठल्यावर मी बीट, गाजर आणि डाळिंबाचा रस पिते. हा रस मला घ्यावाच लागतो, नाहीतर आई मला तो माझ्या लंचबॉक्समध्ये देते. कधीकधी सर्दीसारखं वाटलं तर गरम पाणी पिते. रात्री झोपण्याआधीही मी गरम पाणी पिते आणि सकाळी उठल्यानंतरसुद्धा गरम पाणी पिते. त्यानंतर मग व्यायाम वगैरे करते. पुढे ब्रेकफास्टमध्ये कॉफी आणि त्याबरोबर एखादं अंडं किंवा हाफ फ्राय, ओम्लेट असे काही अंड्याचेच इतर पदार्थ खाते. तसेच अॅव्हाकाडो टोस्ट किंवा सँडविच वगैरे खाते. तसंच एखादं केळ खाते. केळ हा माझा आवडता फळ आहे.”
यानंतर वल्लरीने सांगितले की, ती संध्याकाळी ७ नंतर काहीच खात नाही. अभिनेत्री म्हणाली, “माझ्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट महत्त्वाचा असतो, कारण मी संध्याकाळी ७ नंतर काहीच खात नाही. त्यामुळे मला सकाळीच खूप भूक लागलेली असते. सकाळचा ब्रेकफास्ट हा माझ्यासाठी गरजेचा अन् महत्त्वाचा असतो. त्यानंतर सेटवर आल्यावर माझी कॉफी घेते. मग साधारण ११ वाजताच्या दरम्यान भूक लागते. तेव्हा ड्रायफ्रुट्स किंवा मग काही कुकीज वगैरे खाते. नाहीतर एखादे फळ खाते. त्यानंतर २ वाजता जेवण करते.”
पुढे तिने सांगितले, “दुपारच्या जेवणात भाजी भाकरी दही, सॅलड हे असतं. मला दुपारच्या जेवणात दही लागतंच. तसंच सकाळी अंड खाल्लं नसेल तर दुपारच्या जेवणात चिकन असतं. अंड किंवा मग चिकनद्वारे प्रोटीनचा समतोल साधण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मग ५ वाजताच्या दरम्यान ब्लॅक कॉफी घेते किंवा मग डार्क चॉकलेट खाते. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता थेट जेवण करते. ७ वाजताच्या जेवणात कधीकधी थालीपीठ असतं, कधी पराठे असतात किंवा आई काही वेळेस ज्वारीचं काहीतरी करून देते. ७ नंतर मी काही खात नाही. मग रात्री घरी जाऊन पुन्हा गरम पाणी पिते.”
दरम्यान, वल्लरी विराज ही मराठी टेलिव्हिजन विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने याआधी झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिच्याबरोबर नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस मराठी ६’चा उपविजेत राकेश बापट मुख्य भूमिकेत होता. यानंतर ती पुन्हा झी मराठीवरीलच ‘शुभ श्रावणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
