छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘भाबीजी घर पर हैं’ मध्ये शुभांगी अत्रे हिने मुख्य भूमिका साकारली होती. १० वर्षे तिने ही मालिका ‘अंगूरी भाभी’ म्हणून गाजवली. शुभांगी अत्रे एक ‘सिंगल मदर’ असून तिची मुलगी अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे. शुभांगीने मागच्या वर्षी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर काही महिन्यांनीच तिचा एक्स पती पियुष पुरे याचं निधन झालं.

शुभांगी अत्रेचा आज, ११ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिने ‘आयएएनएस’शी बोलताना वैयक्तिक आयुष्यातील खास गोष्टी सांगितल्या. शुभांगी म्हणाली, “आयुष्य हे अनेक गोष्टींनी बनलेलं असतं, काही लोक येतात तर काही सोडून जातात. जेव्हा आपण २० वर्षांचे असतो, तेव्हा आपल्यात ऊर्जा खूप असते, पण काय चांगलं आणि काय वाईट याची नीट ओळख नसते. मात्र, वय वाढते तशी निर्णय घेण्याची क्षमताही सुधारते, कारण आपण गोष्टी स्वीकारायला शिकतो. जे घडतंय त्यामागे काहीतरी कारण असेल असं आपल्या समजतं, त्यामुळे तक्रारीही कमी होतात.”

शुभांगी अत्रेने मुलीला स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला पाठवलं

शुभांगीची मुलगी सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे आणि तिच्यापासून दूर राहणं सोपं नाही. माय-लेकीच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “माझी मुलगी अमेरिकेत शिकतेय. अमेरिका व भारताच्या वेळेतील फरकामुळे कधीकधी आमचं सतत बोलणंही होत नाही. पण मला वाटतं की शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंदूरहून मुंबईला आले, तसेच मी माझ्या मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला पाठवले आहे. आपल्या मुलांना भरारी घेण्यास बळ देणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. आजच्या काळात प्रत्येक स्त्रीने सक्षम असणे खूप गरजेचे आहे.”

नात्यात पडण्याची इच्छा नाही -शुभांगी अत्रे

शुभांगी अत्रे सध्या सिंगल आहे आणि तिला तूर्तास कोणत्याही नवीन नात्यात अडकण्याची इच्छा नाही. पती-पत्नीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं जास्त आवडतं, असं तिने सांगितलं. “कधीकधी खूप एकटं वाटतं, खासकरून अडचणीच्या काळात. पण आता या वयानुसार परिस्थिती हाताळणं मला जमू लागलंय. या वयात दुसऱ्या कोणत्याही नात्याच्या साच्यात सामावणं कठीण जातं,” असं शुभांगी अत्रे म्हणाली.

मैत्री असलेलं पती-पत्नीचं नातं मला जास्त आवडतं – शुभांगी अत्रे

ती पुढे म्हणाली, “माझ्या मते ते पती-पत्नी जास्त सुखी असतात जे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ते नातं भीतीवर नाही तर मोकळेपणावर टिकतं. भविष्यात जर मी कधी रिलेशनशिपमध्ये गेले, तर आधी करेन. मला माझ्या कोणत्याही निर्णयाचा पश्चात्ताप नाही. माझ्या मते, तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती येते ती तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येते. माझे लग्न खूप लवकर झाले होते, पण वेळेनुसार प्रत्येकाच्या भावना बदलतात. मला काही जुन्या गोष्टींची आठवण येते, पण त्याबद्दल मनात कोणतीही तक्रार किंवा पश्चात्ताप नाही.”

पतीच्या लॅपटॉपमधील फोटोमुळे मिळाली पहिली संधी

शुभांगीने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, मुलीच्या जन्मानंतर ती पती पियुषसोबत पुण्याला राहायला आली होती. “मला लवकरच याची जाणीव झाली होती की मला काम करावं लागेल. लग्नानंतर अवघ्या ७ दिवसांतच मी एका कॉस्मेटिक सेंटरमध्ये कामासाठी मुलाखत द्यायला बाहेर पडले होते.” तिचे पती एका जाहिरात संस्थेत काम करत होते आणि त्यांच्यामुळेच शुभांगी यांना अभिनयात पहिली संधी मिळाली.

शुभांगी म्हणाली, “पियुष एका जाहिरात संस्थेत होते आणि त्यांच्या लॅपटॉपमध्ये माझा एक फोटो होता. तो फोटो कोणीतरी पाहिला आणि विचारलं ‘अरे, ही कोण आहे?’ तेव्हा पियुष म्हणाले- ‘ही माझी पत्नी आहे.’ त्यावर त्यांनी विचारलं, ‘ही आमच्यासाठी मॉडेलिंग करेल का?’ त्यांचा पुण्यातीलच एका स्थानिक ब्रँडचा शॅम्पू होता. पियूष यांनी मला त्याबद्दल विचारले आणि मी लगेच होकार दिला. त्या कामासाठी मला त्यावेळी २५०० रुपये मिळाले होते.”

शुभांगी अत्रेने पुढे कसौटी जिंदगी की मालिकेसाठी ऑडिशन दिली. यात तिची निवड झाली. यानंतर तिचं अभिनय करिअर सुरू झालं आणि तिने मागे वळून पाहिलं नाही.