Shweta Shinde Lovestory : श्वेता शिंदे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती आहे. तिने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे. मालिकांमधून विविध प्रेमकहाण्या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणाऱ्या श्वेता शिंदेची प्रेमकहाणीसुद्धा तितकीच खास आहे. श्वेता शिंदेने नुकतीच ‘झी मराठी’वरील ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिच्यासह तिचे पतीसुद्धा उपस्थित होते. दोघांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल, त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे. कार्यक्रमादरम्यान श्वेताचे पती संदीप भन्साळी यांनीदेखील काही गमतीशीर किस्से सांगितले आहेत.

पहिल्याच दिवशी झालेलं भांडण

कार्यक्रमात संदीप भन्साळी श्वेता शिंदेबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल म्हणाले, “आम्ही एका प्रोडक्शन हाऊससाठी पायलेट एपिसोड शूट करत होतो. २००५ साली मला प्रड्युसरचा फोन आला की त्यांच्या हिरोचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, फॉरेन्सिक डॉक्टरांची भूमिका होती वगैरे. तर एका लिफ्टचा शॉट होता, त्यातून आम्ही चालत येत होतो तर तेव्हा मी सगळ्यांना हाय हॅलो करत होतो. हिला म्हटलं हाय मी संदीप, तर तिने आधी नाक मुरडलं आणि नंतर तू हे डिजर्व करत नाही, कोणी भेटलं नाही म्हणून तुझी निवड केली, असे म्हणाली. मग मला राग आला आणि आमचं पहिल्या भेटीतच भांडण झालं.”

श्वेता शिंदे म्हणाल्या, “खूप भांडण झालं होतं. इतकं की मी त्याला मारायला धावले होते. दोन तास शूटिंग थांबलं होतं, एवढं दोघांचं भांडण झालं होतं.” पुढे संदीप म्हणाले, “दोन अडीच वर्षांनंतर आमच्या लग्नाला ते दिग्दर्शक आणि निर्माते आले होते, तेव्हा ते केविलवाणा चेहरा करत म्हणाले, हेच करायचं होतं तर मग आमची वाट का लावली.”

संदीप यांनी पुढे त्यांनी श्वेता यांना कसं प्रपोज केलं याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, “डेटिंग करत असताना आम्ही एका ठिकाणी जेवायला गेलो होतो आणि हिने वेटरला ऑर्डर दिली होती. सी फूड होतं सगळं. तेव्हा तिने तिची ऑर्डर दिली आणि मला म्हणाली तुला काय हवं आहे ते सांग. मी म्हटलं हे सगळं कोण खाणार, तर ती म्हणाली मी खाणार आहे. तेव्हा खेकडा हा प्रकार माझ्यासाठी नवीन होता. मी खाल्ला होता एकदा, पण त्याची फार सवय नव्हती. तेव्हा त्यांनी खेकड्याची नांगी दिली होती मला.”

श्वेता शिंदेला संदीप भन्साळींनी ‘असं’ केलेलं प्रपोज

संदीप पुढे म्हणाले, “मी तेव्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती जेवणात गुंतलेली. तर तेव्हा मी ती नांगी हातात घेऊन तिला माझ्याशी लग्न करशील का असं विचारलं तेव्हा तिने हो किंवा नाही असं उत्तर न देता आयुष्याभर असंच खाऊ घालशील का असं म्हणाली. मी म्हटलं, हो.” श्वेता व संदीप यांच्या लग्नाला १८ वर्ष झाली असून त्यांना १४ वर्षांची एक वामिका नावाची मुलगी आहे.