Shweta Tiwari and Raja Chaudhary Divorce : मनोरंजन विश्वामध्ये घटस्फोट आणि रिलेशनशिपच्या नेहमीच चर्चा रंगत असतात. सध्या मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही जोरदार चर्चेमध्ये आली आहे. श्वेता तिवारीचा एक्स पती व अभिनेता राजा चौधरीने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. घटस्फोटाच्या अनेक वर्षांनी राजा चौधरीने त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत आणि मुलगी पलक तिवारीसंदर्भात त्याचं मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे, एका घराच्या बदल्यात राजाने मुलगी पलकवरील हक्क सोडल्याचा दावा केला जातो. यावरही राजा चौधरीने त्याची भूमिका मांडली आहे.
राजा चौधरी आणि श्वेता तिवारीनं १९९८ मध्ये प्रेमविवाह केला होता. दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं, पण त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर २००७ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता, त्यानंतर २०१२ मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. घटस्फोट होऊन अनेक वर्षे झाल्यानंतर राजा चौधरीने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्यांची मुलगी पलक तिवारीला तो खूप कमी वेळा भेटला असून त्याने तिला सोशल मीडियावर ब्लॉक केल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेवेळी मुलीच्या बदल्यात फ्लॅट घेतल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
घटस्फोटाआधी मुलीच्या बदलत्यात मागितला फ्लॅट
घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान श्वेता तिवारीने मालाडमधील सुमारे ९३ लाख रुपये किमतीचा वन बीएचके फ्लॅट राजा चौधरीच्या नावावर केला होता. त्याबदल्यात राजाने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करीत मुलगी पलक तिवारीच्या ताब्यासाठी कोणताही दावा करणार नसल्याचं मान्य केलं होतं, असा दावा केला जातो. श्वेताने यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. ती म्हणालेली, “राजाने तो फ्लॅट स्वतःच्या नावावर करायला लावला होता. त्याची मालकी पलक व राजामध्ये मिळून करावी, असं मी त्याला सांगितलं होतं. पण त्यानं नकार दिला. घटस्फोटाच्या आधी राजानं तो फ्लॅट स्वतःच्या नावावर करण्याची अट घातली होती. राजा मला म्हणाला, ‘मी माझ्या मुलीचा त्याग करेन, पण मला फ्लॅट दे. फ्लॅट दिलास तर मी तुला घटस्फोट देईन.'”
श्वेता तिवारीच्या या दाव्यावर आता सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजा चौधरीने त्याची बाजू मांडली आहे. तो म्हणाला, “२००७ मध्ये आम्ही वेगळे झालो आणि त्यानंतर प्रकरण फॅमिली कोर्टात गेलं. २००७ ते २०१२ या काळात श्वेता खूप कमी वेळा सुनावणीला आली. मात्र, मी प्रत्येक सुनावणीला हजर राहत होतो. न्यायालयाने पलकला ठराविक ठिकाणी भेटण्याची परवानगी मला दिली होती. मात्र, श्वेता कधीच तिला घेऊन मला भेटण्यासाठी आली नाही. खूप वर्षे न्यायलयात हे प्रकरण सुरू असल्यामुळे मला खूप कंटाळा आला होता. मी पूर्णपणे वैतागून गेलो होतो,”
कोणी खरेदी केला होता मालाड येथील फ्लॅट?
राजा चौधरीने तो फ्लॅट कसा खरेदी केला होता, याबाबत सांगितलं. तो म्हणाला, “श्वेताशी लग्न झाल्यानंतर माझ्या वडिलांनी ९ लाख रुपयांना हा वन बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. सुरुवातीची रक्कम वडिलांनी भरली होती, तर त्यानंतरचे हप्ते (ईएमआय) मी आणि श्वेता दोघांनी मिळून भरले होते. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा मला काहीच नको होतं. पण राहण्यासाठी भाड्यानं घर देण्यासही कोणी तयार होत नव्हतं. तेव्हा मी तिला सांगितलं होतं, ‘हा फ्लॅट मला दे. बाकी तुझं साम्राज्य, तुझी मुलगी आणि तुला जे काही हवं आहे ते तू घेऊन जाऊ शकते. पण फक्त माझ्या आयुष्यातून निघून जा आणि मला शांततेत जगू दे.'”
आरोपांवर काय म्हणाला राजा चौधरी?
मुलीच्या बदल्यात फ्लॅट घेतल्याचा आरोप राजा चौधरीने फेटाळला आहे. तो म्हणाला, “असं कसं म्हणू शकतात की मी माझ्या मुलीला सोडून दिलं? एखादा माणूस राहण्यासाठी घर शोधत असेल किंवा शांतपणे आयुष्य जगण्यासाठी घर मागत असेल, तर याचा अर्थ मुलीला सोडलं असा कसा होऊ शकतो? मुलगी आणि संपत्ती या दोन गोष्टींची तुलना तरी कशी केली जाऊ शकते? श्वेताने ही घटना सर्वांना अशा पद्धतीने सांगितली की त्यामुळे माझी पूर्ण प्रतिमा खराब झाली,”
