Actor Siddharth Chandekar & Wife Mitali Mayekar Buys Second New Home : ‘झिम्मा’, ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’, ‘क्लासमेट्स’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर. त्याने वैयक्तिक आयुष्यात २०२१ मध्ये अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ-मितालीने लग्नानंतर वर्षभराने मुंबईत दोघांचं पहिलं हक्काचं घर खरेदी केलं होतं. घराचं रजिस्ट्रेशन केल्यावर या दोघांनी खास फोटो शेअर केले होते आणि आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या लाडक्या जोडीने प्रेक्षकांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.

सिद्धार्थ व मितालीने आता दुसरं एक नवीन घर खरेदी केलं आहे. नव्या घरात गुढी उभारून या जोडप्याने एक नवीन सुरुवात केली आहे. मितालीने इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ शेअर करत या नव्या घराची पहिली झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे.

मिताली व सिद्धार्थ दोघंही एकत्र या व्हिडीओमध्ये नव्या घरात गुढी उभारून पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त अभिनेत्रीने मराठमोळा लूक केला आहे. पिवळ्या सुंदर साडी, केसात गजरा या लूकमध्ये मिताली खूपच सुंदर दिसतेय. या दोघांच्या नव्या घरातून खूपच सुंदर व्ह्यू पाहायला मिळतोय. याशिवाय या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ-मितालीच्या प्रशस्त अशा लिव्हिंग रूमची झलक पाहायला मिळतेय. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

“नवीन वर्ष, नवं घर, नवी सुरुवात! गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!” असं कॅप्शन मिताली मयेकरने या पोस्टला दिलं आहे.

सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घराच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांसह मराठी कलाकारांनी या जोडप्याला नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अलीकडेच तो माधुरी दीक्षितसह ‘मिसेस देशपांडे’ या सीरिजमध्ये झळकला. याशिवाय सिद्धार्थची हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या ब्लॉकबस्टर सिनेमात सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका होती. यासह अभिनेता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या माया सिनेमात सुद्धा झळकला होता. तर, मिताली ‘फ्रेशर्स’ मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली होती.