Siddharth Chandekar Ukhana : मराठी कलाविश्वातील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या त्याच्या ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘झिम्मा’ चित्रपटाच्या दोन्ही भागांच्या यशानंतर आता अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे याने दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट म्हणजे ‘फसक्लास दाभाडे’. आता येत्या जानेवारी महिन्यात २४ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच या चित्रपटातील हळदीचं नवकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
‘आता सुरु होणार लग्नाचा खरा फसक्लास हंगाम…उद्यापासून अख्खी फॅमिली नाचणार!’ असं कॅप्शन देत या गाण्याची पहिली झलक दिग्दर्शकाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या गाण्याचं नाव ‘यल्लो यल्लो’ असं आहे. या गाण्याच्या लॉन्चला चित्रपटातील सगळीच कलाकार मंडळी तसेच संगीत दिग्दर्शक सुद्धा उपस्थित होते. यावेळी सगळ्यांनी गालावर हळद देखील लावली होती. तसेच हेमंत ढोमेने या लॉन्च इव्हेंटला जबरदस्त डान्स केल्याचं देखील पाहायला मिळालं.
प्रेक्षकांना ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. यामध्ये अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, निवेदिता अशोक सराफ, हरीश दुधाडे, राजसी भावे, राजन बिसे आणि क्षिती जोग या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या या लॉन्च इव्हेंटमध्ये सिद्धार्थ चांदेकरने घेतलेल्या उखाण्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
गाण्याचा लॉन्च सोहळा पार पडताना अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारासाठी म्हणजेच पत्नी मिताली मयेकरसाठी एक खास उखाणा घेतला. याचा व्हिडीओ शेअर करत मितालीने देखील लाडक्या नवऱ्याचं कौतुक केलं आहे.
सिद्धार्थ चांदेकर उखाणा घेत म्हणतो, “सिनेमा बनलाय दणक्यात, आहे खणखणीत आमचं नाणं! मितालीचं नाव घेतो अन् तिला गिफ्ट करतो हे फर्स्टक्लास गाणं”
मिताली उखाण्याचा हा व्हिडीओ शेअर करत लिहिते, “गिफ्ट लईच आवडलं बरं का किरण राव! खूप खूप प्रेम सिद्धार्थ”, अभिनेत्रीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘किरण राव’ म्हटलंय कारण, सिद्धार्थ चांदेकर ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपट ‘किरण दाभाडे’ उर्फ पप्पू ही भूमिका साकारत आहे.
दरम्यान, हेमंतच्या यापूर्वीच्या ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ चित्रपटांनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. त्यामुळे आता या नव्या ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.