Simran Khedkar exit from Devmanus: विविध जॉनरच्या मालिकांचा प्रेक्षक वर्ग वेगळा असतो. कौटुंबिक, क्राइम, भयपट, विनोदी अशा विविध जॉनरच्या मालिका, चित्रपट, वेब सीरिज, नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

झी मराठी वाहिनीवर ‘देवमाणूस’ ही मालिका वेळोवेळी लक्ष वेधून घेत असते. प्रेम, खून, मारामारी, लालसा, गुन्हा लपवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध युक्त्या, गुन्हेगाराला पकडण्यासाठी चाललेली धडपड; या आणि अशा अनेक गोष्टी मालिकेत पाहायला मिळतात.

देवमाणूस मालिकेतील गोपाळ हा त्याच्या पैशांच्या हव्यासापोटी अनेक गुन्हे करतो. तो सतत त्याच्या फायद्याचा विचार करतो. गावातील सुंदर पण घरात आनंदी नसणाऱ्या, काहीतरी अडचणींचा सामना करणाऱ्या अशा स्त्रियांना तो आपल्या जाळ्यात ओढतो. त्यांच्यावर प्रेम आहे असे सांगतो. त्यांना सुखी भविष्याची स्वप्ने दाखवतो.

लग्न करण्याचे वचन देतो. पण, भविष्य सुरक्षित हवे असेल तर काही पैशांची गरज लागेल, त्यामुळे जेव्हा आपण या गावापासून दूर जाऊ, तेव्हा तुझ्याकडील सगळे पैसे, दागिने घेऊन ये असे गोपाळ त्या स्त्रियांना सांगतो. गोपाळवर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवणाऱ्या स्त्रिया त्याचे ऐकतात. पण, गोपाळ ते पैसे दागिने त्यांच्याकडून घेतो आणि त्यांना मारून टाकतो.

आता गोपाळच्या प्रेमात ज्या स्त्रिया पडतात, त्यांना जीव गमावावा लागत आहे. आधी फक्त गोपाळ खून करत होता, पण आता लालीदेखील गोपाळप्रमाणेच इतरांचा जीव घेत असल्याचे दिसत आहे.

‘देवमाणूस’ मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट

देवमाणूस मालिका ज्या पद्धतीने पुढे जाते, तिथे कोणाला ना कोणाला जीव गमवावा लागतो. मालिकेत दाखविल्याप्रमाणे नुकताच आर्याचा खून झाला आहे, त्यामुळे हे पात्र आता मालिकेत पुढे दिसणार नाही.

आर्या ही स्वत:च्या पायावर उभी राहण्यासाठी धडपड करत होती. तिचा नवरा गेल्यानंतर ती एकटी पडली होती. मात्र, भावाने म्हणजेच इन्स्पेक्टर जामकरने तिला वेळोवेळी साथ दिली. जामकरचे त्याच्या लहान बहिणीवर प्रचंड प्रेम होते. ती कायम सुरक्षित राहावी म्हणून तो सतत प्रयत्न करत असे. पण, जेव्हा ती गोपाळच्या प्रेमात पडली तेव्हा तिने तिच्या भावापासून अनेक गोष्टी लपवण्यास सुरुवात केली आणि शेवटी तिला जीव गमवावा लागला.

आर्या ही भूमिका अभिनेत्री सिमरन खेडकरने साकारली आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, “ज्याची सुरुवात झाली होती, त्याचा शेवट झाला.”

दरम्यान, सिमरन आता आगामी काळात पुन्हा कोणत्या मालिकेत दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.