Abhijeet Sawant On Bigg Boss Marathi : ‘इंडियन आयडल’ या गाण्याच्या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेला लोकप्रिय मराठमोळा गायक म्हणजे अभिजीत सावंत. अभिजीत सावंत नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. ‘बिग बॉस मराठी ५’ पर्वात तो टॉप २ पर्यंत पोहोचत उपविजेता ठरला. या शोमध्ये तो का गेला होता, याचं नुकत्याच एका मुलाखतीत त्यानं कारण सांगितलं आहे.
बिग बॉसच्या घरातल्या आपल्या वागण्याने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. यामुळेच तो ‘बिग बॉस मराठी ५’च्या टॉप २ पर्यंत पोहोचत उपविजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’चा शो जरी संपला असला तरी त्याची बिग बॉसच्या घराबाहेरदेखील चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. अशातच त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत बिग बॉस मध्ये जाण्याचं कारण सांगितलं आहे. स्वतःला ओळखण्यासाठी बिग बॉसमध्ये गेलो असल्याचं त्यानं यावेळी सांगितलं.
आरपारला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत म्हणाला “कधी कधी आपण स्वत:बद्दल काही प्रश्नचिन्हं निर्माण करतो. ते खूप कठीण जातं. माझा बिग बॉस मध्ये सहभागी होण्याचा हाच मोठा भाग होता तो म्हणजे लोक मला म्हणतात की मी खूप चांगला आहे. पण मी खरंच चांगला आहे का? किंवा माझ्यातही काही दोष असतीलच ना… मग ते दोष काय आहेत; ते मला जाणून घ्यायचं होतं.”
यापुढे अभिजीत म्हणाला, “सर्वांमध्येच काहीनं काही दोष असतातच. तुम्ही त्याच्यावर कसं काम करता, हे महत्त्वाचं आहे. एखाद्याला तुम्ही त्याच्यातले दोष दाखवता, तेव्हा तुमचं चांगलं वर्तनही दाखवू शकता. नाही तर काही लोकांना त्यांचे दोष दाखवणं जास्त गरजेचं वाटतं. ती गोष्ट वेगळी आहे. पण मला स्वतःला ओळखायचं होतं, स्वत:ला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी बिग बॉस मध्ये गेलो.”
दरम्यान, २००४ साली भारतात टेलिव्हिजनवर एक सिंगिंग रिअॅलिटी शो आला होता. त्या शोचं नाव होतं ‘इंडियन आयडल’. या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता होता महाराष्ट्राचा गायक अभिजीत सावंत. त्यानंतर लगेचच काही दिवसांत त्याचा ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ नावाचा नवीन अल्बम आला. यामधील त्याच्या गाण्यांनी त्याला केवळ प्रसिद्धीच नाही तर अनेक संधीही मिळवून दिल्या.
एकेकाळचा हा आयडल मध्यंतरी मात्र प्रसिद्धी झोतापासून खूपच दूर राहिला. त्यामुळे तो नक्की कुठे गेला? याबद्दलच्या अनेक चर्चा सर्व माध्यमांमध्ये झाल्या होत्या. अशातच त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात एण्ट्री घेतली आणि तो पुन्हा एकदा चर्चेत आला. शोमधील आपल्या खेळानं आणि वागणुकीनं त्यानं पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकली. या शोचा तो उपविजेत ठरला होता. तर सूरज चव्हाणनं शोच्या विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली.
