गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. त्यामुळे गणपतीच्या ११ दिवसांमध्ये घरोघरी विविध प्रकारचे मोदक बनवले जातात. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम गायक प्रथमेश लघाटेने सुद्धा लाडक्या बाप्पासाठी खास उकडीचे मोदक बनवले आहेत.
तांदळांच्या पीठाची उकड काढून तयार केलेल्या मोदकांचं गणपतीच्या दिवसांमध्ये विशेष आकर्षण असतं. प्रथमेश लघाटे उकडीचे मोदक बनवत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उकडीचे मोदक बनवणं ही एक कला आहे. प्रत्येकाला हे मोदक जमतातच असं नाही. काहीं लोकांना ते जमतात, तर काहींचा आकार बिघडतो, अनेकवेळा हे मोदक फुटतात. त्यामुळे प्रथमेशला अगदी सहज मोदक वळताना पाहिल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
हेही वाचा : राघव चड्ढा-परिणीती चोप्राच्या लग्नात कोणत्या प्रकारचं जेवण असणार? अभिनेत्रीने स्वतः ठरवलाय खास मेन्यू
दरम्यान, गायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायनसह लग्नाबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी त्यांचा एक फोटो शेअर करत ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे प्रथमेशने शेअर केलेल्या उकडीच्या मोदकांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
प्रथमेशच्या व्हिडीओवर मुग्धाने हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. याशिवाय अन्य काही नेटकऱ्यांनी “मुग्धा खूप लकी आहे”, “मोदकाच्या हातचे ” मोदक ” खायला आलं पाहिजे…”, “आता मुग्धालाही मोदक शिकवायला लागतील.”, “या मोदक बनविण्याच्या पाककृतीमुळे कोणीही मुग्धच होईल.” अशा कमेंट्स केल्या आहेत.