Shark Tank India 2 : पाच आठवड्यात शार्क्सनी केली ४० कोटींहून अधिक गुंतवणूक; वाचा कोणत्या शार्कनी किती पैसे गुंतवले? | six sharks of shark tank india season 2 invested more than 40 crores in five weeks | Loksatta

Shark Tank India 2 : पाच आठवड्यात शार्क्सनी केली ४० कोटींहून अधिक गुंतवणूक; वाचा कोणत्या शार्कनी किती पैसे गुंतवले?

सीझन २ सुरू होऊन ५ आठवडे झाले आहेत आणि नुकतंच सोनीने यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे

shark tank india all sharks investments
फोटो : इंडियन एक्सप्रेस

Shark Tank India Season 2 : ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनची जबरदस्त चर्चा आहे. पहिल्या सीझनपैकी भारतपे कंपनीचा फाउंडर अशनीर ग्रोव्हर या दुसऱ्या सीझनमध्ये नसल्याने बऱ्याच लोकांना हा सीझन आवडणार नाही अशी चर्चा होती. पण हा नवा सीझनही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे आणि देशातील वेगवेगळ्या उद्योजकांच्या भन्नाट बिझनेसमध्ये कार्यक्रमातील शार्क्स हे भरभरून गुंतवणूक करत आहेत.

गेल्या सीझनमध्ये नमिता थापर हिने कमी गुंतवणूक केली असली तरी या नव्या सीझनमध्ये ५ आठवड्यानंतर समोर आलेले आकडे पाहता नमिता थापर ही सध्या प्रथम क्रमांकावर आहे. सीझन २ सुरू होऊन ५ आठवडे झाले आहेत आणि नुकतंच सोनी टेलिव्हिजनने यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या शार्कने आत्तापर्यंत किती रुपयांची गुंतवणूक केली आहे याचे आकडे मांडले आहेत.

आणखी वाचा : ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खानने सांगितलं ‘किंत्सुगी’चं महत्त्व; काय आहे या जपानी कलेचा खरा अर्थ?

या स्पर्धेत एमक्यूअरची सीइओ नमिता थापर पहिल्या क्रमांकावर आहे तिने आत्तापर्यंत १०.२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. खालोखाल लेन्सकार्टचा सीइओ पियुष बन्सलने विवध कंपन्यांमध्ये ८.८६ कोटी एवढी गुंतवणूक केली आहे. बोट कंपनीचा सीइओ अमन गुप्ताने सुद्धा तब्बल ८.२६ कोटींची गुंतवणूक या दुसऱ्या सीझनमध्ये केली आहे. शादी.कॉमचा सीइओ अनुपम मित्तलने आणि शुगर कॉस्मेटीक्सची सीइओ विनीता सिंगने मात्र यंदाच्या सीझनमध्ये अनुक्रमे ७.२९ कोटी आणि ४.६१ कोटी एवढीच रक्कम गुंतवली आहे.

अशनीर ग्रोव्हरच्या ऐवजी कारदेखो कंपनीचा सीइओ अमित जैनला फारशा भागांमध्ये संधी मिळाली नसल्याने त्याने आत्तापर्यंत केवळ ३.६६ कोटींची गुंतवणूक केली आहे. सगळ्या शार्क्सनी मिळून या दुसऱ्या सीझनच्या ५ व्या आठडव्यापर्यंत ४२.९३ कोटी रुपये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले आहेत. येत्या काही भागांमध्ये हे शार्क्स आणखी बरीच गुंतवणूक करतील अशी अपेक्षा आहे. हा कार्यक्रम तुम्ही सोनी टेलिव्हिजनवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता बघू शकता, तसेच सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही याचे भाग उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 17:34 IST
Next Story
Video : वनिता खरातच्या मंगळसूत्राची हटके स्टाइल, डिझाईनची सोशल मीडियावर चर्चा