इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर जगभरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर इराणने देखील कतार, कुवेत, बहरिन, संयुक्त अरब अमिराती येथील अमेरिकी लष्करी तळांवर प्रतिहल्ले केल्यामुळे हा वाद आणखी पेटला. या हल्ल्यानंतर जगभरातील विमान कंपन्यांनी पश्चिम आशियातील विमानसेवा स्थगित केली आहे. यामुळे दुबईतील सगळी विमान उड्डाणं गेल्या काही दिवसांपासून रद्द करण्यात आली आहेत. एअरस्पेस बंद झाल्यामुळे अनेक भारतीय सध्या दुबईत अडकले आहेत.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर सुद्धा गेल्या तीन दिवसांपासून दुबईत अडकली आहे. स्मिता तिच्या कुटुंबाबरोबर परदेशात होती. आता तिला युद्धामुळे भारतात परत येण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, या कठीण काळात अभिनेत्रीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मदत केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्मिताने याबाबत माहिती दिली आहे; तसेच उपमुख्यमंत्र्यांचे तिने आभार मानले आहेत.

स्मिता लिहिते, “गेले काही दिवस खूप आव्हानात्मक होते. स्फोटकांचे आवाज, रात्री दिसणारी क्षेपणास्त्र…हे सगळं आमच्यासाठी फार कठीण होतं. पण, परिस्थिती केव्हातरी नीट होईल आणि आम्ही लवकरच घरी परतू अशी आशा मनात कायम आहे. पण, सध्या दुबईतून विमानांची उड्डाणं बंद करण्यात आली आहेत. मी वारंवार बुकिंग करतेय, चेक-इन करतेय पण दररोज उड्डाणे रद्द होत असल्याने आता घरी परतणं केवळ अशक्य वाटू लागलं होतं. माझ्याबरोबर इथे आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला मायदेशी यायचं होतं. या कठीण काळात आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांकडून मदत मिळाली.”

“मी उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त राहुल गेठे यांनी मला त्वरीत सहकार्य केलं. आमची राहण्याची सोय केली…आम्हाला पिकअप करण्यापासून ते आम्ही भारतात सुरक्षितपणे कसे येऊ यासाठी या सगळ्यांनी प्रचंड मदत केली. त्यांच्या पाठिंब्यामुळे माझ्यासारख्या इथे अडकलेल्या अनेक भारतीयांना सुरक्षितपणे भारतात येण्याचा मार्ग सापडला. अशा गंभीर परिस्थितीत मदत केल्याबद्दल खूप आभार…आपलं सरकार आम्हा सगळ्या भारतीयांच्या पाठिशी ठामपणे उभं आहे. मला एक भारतीय म्हणून याचा खूप अभिमान आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचे मनापासून आभार मानते.”

एकनाथ शिंदे यांनी स्मिता आणि तिच्या कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला आणि विचारपूस केली. या व्हिडीओवर अभिनेत्रीच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यातील एका कमेंटला रिप्लाय देत “आम्ही आता सुरक्षित आहोत…उद्यापर्यंत भारतात परतू” अशी माहिती अभिनेत्रीने दिली आहे.