Smita Sarvade on Why do producers default on payments: मालिका, सिनेमांत काम करणाऱ्या कलाकारांचे किंवा तंत्रज्ञ टीममधील अनेकांचे पैसे बुडवले जातात. त्याबद्दल काही कलाकारांनी वेळोवेळी विविध माध्यमांतून याबाबत वक्तव्य केले आहे. आता अभिनेत्री स्मिता सरवदे यांनी निर्माते पैसे का बुडवतात, याबद्दल वक्तव्य केले आहे.

पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनेलला त्यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, अनेकदा निर्माते कामाचे पैसे देत नसल्याचं पाहायला मिळतं. तुमचा काय अनुभव आहे? त्यावर त्या म्हणाल्या, “माझा अनुभव चांगला आहे. माझ्या नशिबानं म्हणा; पण माझे खूप कमी वेळा पैसे बुडवले गेले आहेत. ‘आभाळमाया’चे पूर्ण पैसे आम्हाला मिळाले नाहीत. त्यावेळी विनयसर हिंदीमध्ये राजा शिवाजी ही मालिका करीत होते. त्यामध्ये त्यांचं खूपच नुकसान झालं. आमचे अगदी शेवटी शेवटी पैसे मिळाले नाहीत.”

“त्याचं व्याज आपल्याला मिळत जाईल”

त्या म्हणाल्या, “अगदी खूप बुडवलेत आणि जाणीवपूर्वक बुडवलेत, असं नव्हतं. त्यांना त्या दुसऱ्या मालिकेत खरंच खूप नुकसान झालं होतं, त्यामुळे ते राहिले; पण त्यांचा हेतू कधीच चुकीचा नव्हता. मला तर त्यांनी चांगली संधी दिली होती. त्यामुळे मी तसं म्हणणार नाही. त्यांचा हेतू चांगलाच होता. अनेकदा असं होतं की, परिस्थितीमुळे देता येत नाहीत; पण कधी कधी काही लोकांचे हेतूही चांगले नसतात.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “काही लोकांचं असं असतं की, उशिरा पैसे द्यायचे. त्याचं व्याज आपल्याला मिळत जाईल, तेवढा माझा फायदा होईल. कधी कधी समोरची व्यक्ती वैतागून पैसे सोडून देते. मात्र, एका कलाकाराच्या दृष्टीनं हीच किती वाईट गोष्ट आहे. तुमचं घर ज्या गोष्टीवर चालतं, तुम्ही मेहनत केलेली असते. तुम्हाला ते पैसे मागावे लागतात. १० वेळा फोन करावे लागतात.”

त्या असेही म्हणाल्या, “मला माहीत आहे की, काही निर्माते वेळेत पैसे देतात. हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. कोठारे व्हिजन, आयरिस प्रॉडक्शन, विद्याधर पाठारे, राकेश सारंग हे सगळे वेळेच्या वेळी पैसे देतात. ते चार गोष्टी जास्त करत नाहीत. त्यांच्याकडे चार मालिका आल्या तरी ते करत नाहीत. कारण- त्यांना माहीत असतं की, माझं बजेट एवढं आहे. इथले पैसे तिकडे लावेन आणि तिथले पैसे इकडे लावेन, हा जो हिशोब असतो. काही निर्माते यामध्ये फसतात.”

शेवटी त्या म्हणाल्या, “जे वेळेत पैसे देतात, ते निर्माते इतके जुने आहेत. त्यांचंही नुकसान होतच असेल. पण, त्यांनी त्याची झळ त्यांच्या युनिटला किंवा कलाकारांना पोहोचू दिली नाही. त्यांघंही नुकसान होत असणार. प्रत्येक निर्मात्याला फायदा आणि नुकसान होतंच. पण, फायदा मागायला कलाकार त्यांच्याकडे जात नाहीत; मग नुकसान कलाकारांना का सहन करायला लागतं. फक्त आम्हालाच का सहन करावं लागतं, का याचं काही उत्तरच नाही. कलाकारांच्या बाबतीत ही एक फार दु:खदायक बाब आहे, हे व्हायला नको.

“मला हेच वाटतं की, तुम्ही एखाद्यावर किती अवलंबून आहात. तुम्ही जर निर्माते आहात, तर तुम्हाला तुमच्या युनिटमधील प्रत्येकाची बाजू माहीत असायला पाहिजे. तुमचा प्रॉडक्शनवाला जर तुमचं नुकसान करतोय, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही. तर तुमचं नुकसान हे अपरिहार्य आहे. तो तुमचा दोष आहे, तो तुम्ही इतरांवर टाकू शकत नाही. तुम्ही पूर्ण वेळ लक्ष दिलं, तर तुम्ही यशस्वी निर्माते होऊ शकता. कायम हेतूच वाईट असतो, असं नसतं. पण, या सगळ्या गोष्टींचा परिणाम दुसऱ्या माणसांवर होतो. असं व्हायला नाही पाहिजे”, असे म्हणत स्मिता सरवदे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.