अलीकडच्या काळात अनेक लोकप्रिय मराठी कलाकार छोट्या पडद्यावर कमबॅक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोनाली खरे, अजय पूरकर, आदिनाथ कोठारे, गिरीश ओक अशा अनेक कलाकारांची मालिकाविश्वात एन्ट्री झालेली आहे. या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे.
जवळपास २० वर्षांपूर्वी ‘यंदा कर्तव्य आहे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अंकुश चौधरी आणि लोकप्रिय अभिनेत्री स्मिता शेवाळे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यातील “आभास हा…” हे गाणं आजही सर्वत्र लोकप्रिय आहे. स्मिता आणि अंकुश हे दोघंही मराठी सिनेविश्वातील आघाडीचे कलाकार आहेत. स्मिताने आजवर बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय साधारण दोन वर्षांपूर्वी तिने ‘मुरांबा’ मालिकेत सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होती. पण, त्यानंतर स्मिताने या मालिकेतून एक्झिट घेतली. आता ही लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता स्मिता शेवाळेची एन्ट्री होणार आहे. ही मालिका अतिशय महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. रणदिवे कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या मायाचं खरं रूप समोर आल्यानंतर कथानकाला वेगळीच दिशा मिळाली आहे. जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिन्ही सुनांनी आता मायाविरोधात उघडपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या संघर्षाला आता कायदेशीर वळण मिळणार असून, मालिकेत दमदार कोर्टरूम ट्रॅक सुरू होणार आहे. मायाच्या बाजूने केस लढवण्यासाठी एन्ट्री होणार आहे नामांकित वकील गीतांजली सरंजामेची. ही भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे साकारणार आहे.
गीतांजली सरंजामे ही अत्यंत बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि निष्णात वकील आहे. ती प्रत्येक केस अत्यंत शांतपणे आणि अचूकतेने हाताळते. तिच्या कारकिर्दीत तिने एकही केस गमावलेली नाही, त्यामुळे कोर्टात तिची एन्ट्री होणं म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठं आव्हान असतं. मायाची केस लढण्यासाठी गीतांजली रणांगणात उतरणार असून, जानकीची बाजू लढवणाऱ्या अवंतिकासह तिचा सामना रंगणार आहे. या लढाईत विजय नेमका कुणाचा होणार हे लवकरच ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
दरम्यान, रेश्मा शिंदेची प्रमुख भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका दररोज रात्री १०:३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाते.
