Smriti Irani Mother : मनोरंजन आणि राजकारण अशा दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेलं नाव म्हणजे स्मृती इराणी. स्मृती इराणी यांनी टीव्ही विश्वात मालिकांमध्ये अभिनय करत अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. २००० च्या दशकात एकता कपूरची लोकप्रिय झालेली ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. अभिनय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर स्मृती इराणी राजकारणातही सहभागी झाल्या.
मनोरंजन ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या स्मृती इराणींनी त्यांच्या लहानपणी खूप संघर्ष केला आहे. या वयात त्यांनी आईवरचा अन्यायही पाहिला आहे. याबद्दल स्मृती इराणींनी नुकतंच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. मोजो स्टोरी या कार्यक्रमात करण जोहरबरोबरच्या गप्पांमध्ये स्मृती यांनी त्यांच्या लहानपणीच्या काही कटू आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी आई आणि भावडांवरील अन्याय पाहून राग आला असल्याची भावना व्यक्त केली.
मोजो स्टोरी या कार्यक्रमात स्मृती यांना विचारण्यात आले की, असं कोणतं गाणं आहे जे त्यांच्या आयुष्यासंबंधित आहे? यावर त्यांनी उत्तर दिले, एक गाणं असं नाही. पण तो प्रवास ‘कुछ कुछ होता है’पासून ‘अग्निपथ’ गाण्यापर्यंत आहे असं म्हणू शकतो.” यानंतर करणने त्यांना विचारलं की, तुम्हाला प्रेमगीताऐवजी ‘सूड’बुद्धीच्या गाण्याकडे काय जायचं आहे? यावर स्मृती म्हणाल्या, “कारण ‘अग्निपथ’ चित्रपटातील मुख्य पात्राप्रमाणेच, त्यांनी त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड दिलं आहे.”
मुलगा होत नाही म्हणून आईला घर सोडावं लागलं होतं : स्मृती इराणी
यापुढे स्मृती म्हणाल्या, “अग्निपथ चित्रपटात मुलगा आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आईवर अन्याय झाला म्हणून तो बदला घेतो. असंच मलाही माझ्या आईसाठी नेहमी वाटायचं. मी जेव्हा सात वर्षांची होते; तेव्हा मुलगा होत नाही म्हणून माझ्या आईला घर सोडावं लागलं होतं. त्यामुळे आईला तिचं स्वतःचं घर देणं म्हणजे माझ्यासाठी जणू एक अग्निपथच होतं.” यानंतर स्मृती इराणींनी आईला घर घेऊन दिल्याचेही सांगितलं.
याबद्दल त्या म्हणाल्या, “मी आईसाठी नवं घर घेतलं; पण ती अजूनही मला घराचं भाडं म्हणून एक रुपया देते. माझी आई आयुष्यभर भाडेतत्त्वाच्या घरात राहिली आहे. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी एक घर विकत घेतलं. त्या घराबद्दल माझी आई मला एक रुपया भाडे म्हणून देते. जेणेकरून तिचा स्वाभिमान टिकेल. दरम्यान, स्मृती इराणी लवकरच त्यांच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.