Smriti Irani Reveals Rejecting Rishi Kapoor Film : स्मृती इराणी या एकेकाळी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा होत्या. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. यासह त्यांनी इतर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१४ साली त्यांना या मालिकेच्या दुसऱ्या पर्वासाठी विचारणा झाली होती. परंतु, त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे ती ऑफर नाकारल्याचं सांगितलं आहे.
स्मृती यांनी असंही सांगितलं की, त्यांनी एका चित्रपटाची ऑफरसुद्धा नाकारली होती. यामधून त्यांना लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्यासह काम करण्याची संधी मिळाली होती, परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही. स्मृती यांनी बरखा दत्तशी संवाद साधताना याबाबत सांगितलं. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’बद्दल बोलताना स्मृती म्हणाल्या, “आम्ही ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ सारख्या मालिकांची सुरुवात केली. कौटुंबिक मालिकांचे टेंप्लेट छापले. आमच्या मालिकेला रात्री १०:३० ची वेळ देण्यात आली होती, ज्यावेळी भारतात अर्धे लोक झोपलेले असतात”.
स्मृती इराणी पुढे एकता कपूरबद्दल म्हणाल्या, “याचं पूर्ण श्रेय एकता कपूर व त्यांच्या टीमला जातं, कारण आमचा स्लॉट हा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमानंतर होता”. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “२०१४ साली मालिकेच्या दुसऱ्या भागासाठी विचारणा झाली होती. मला संसद भवनात कॅबीनेट मिनिस्टर म्हणून काम करायचं होतं. त्यावेळी मला ही मालिका आणि चित्रपट अशा दोन प्रोजेक्टसाठी विचारणा झाली होती, पण मी यामुळे नकार दिला”.
दरम्यान, ‘फ्री प्रेस जनरल’च्या वृत्तानुसार स्मृती यांनी असंही म्हटलं आहे की, त्यांना लोकप्रिय दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबरोबर चित्रपटात काम करण्याची ऑफर आली होती. एकता कपूरच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलायचं झालं तर माध्यमांच्या माहितीनुसार या मालिकेचा दुसरा भाग सुरू होणार आहे अशी चर्चा केली जात आहे. नुकतंच एकता कपूरच्या वाढदिवसानिमित्त स्मृती इराणी व अमर उपाध्याय यांनी निर्मातीच्या घरी जाऊन भेट घेतली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.