Pooja Birari & Soham Bandekar Wedding : आदेश व सुचित्रा बांदेकरांचा लाडका लेक सोहम आज ( २ डिसेंबर ) विवाहबंधनात अडकणार आहे. पूजा आणि सोहमच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. अखेर दोघांच्या मेहंदी आणि हळदी समारंभाचे फोटो आता समोर आले आहेत. पूजा व सोहम यांच्या लग्नासाठी संपूर्ण मराठी कलाविश्वातील कलाकार एकत्र जमले आहेत. सोमवारी या दोघांचा हळदी समारंभ पार पडला. यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चाहत्यांना अनेक कलाकारांची झलक पाहायला मिळाली. बांदेकरांच्या मुलाला व सुनेला आशीर्वाद देण्यासाठी कोणकोणते कलाकार लग्नाला पोहोचलेत पाहुयात…
सोहम व पूजा यांचा लग्नसोहळा मुंबईत नव्हे तर लोणावळा येथे पार पडत आहे. यासाठी मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार लोणावळ्यात पोहोचले आहेत.
सोहमच्या लग्नातील इनसाइड व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना सचित पाटील, अभिजीत केळकर, ऋजुता देशमुख, अजित परब, सुमीत राघवन, दिपाली विचारे, सानिका बनारसवाले, सुकन्या मोने अशा बऱ्याच कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. लग्नाला आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आदेश व सुचित्रा बांदेकर मोठ्या आपुलकीने स्वागत करत असल्याचं व्हायरल व्हिडीओजमध्ये पाहायला मिळत आहे.
आणखी काही कलाकार देखील या नव्या जोडीला शुभेच्छा देण्यासाठी लोणावळ्यात जाणार आहेत. सोहम सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या दोन मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. या दोन्ही मालिकांमधील काही कलाकार सोहमच्या लग्नाला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय पूजा बिरारी सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या टीमने तिचं केळवण सुद्धा केलं होतं. त्यामुळे या मालिकेच्या टीमचे काहीजण सुद्धा पूजाला शुभेच्छा देण्यासाठी लग्नाला येतील.
सोहम व पूजा बिरारी यांच्या लग्नाआधीच्या विधींना शनिवारपासूनच सुरुवात झाली आहे. यावेळी पूजाने मेहंदी सोहळ्यातील सुंदर फोटो शेअर करत सोहमसाठी खास पोस्ट शेअर केली होती. यानंतर सोमवारी ( १ डिसेंबर ) सकाळी दोघांचा हळदी समारंभ पार पडला आणि रात्री मोठ्या जल्लोषात संगीत सोहळा पार पडला. संगीतसाठी सोहम-पूजाने व्हाइट रंगाच्या आऊटफिटमध्ये ट्विनिंग लूक केला होता.
