Soham Bandekar & Puja Birari Praoposal Stroy : मराठी कला विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी अलीकडे लग्न केलं. यापैकीच एक जोडी म्हणजे सोहम बांदेकर व पूजा बिरारी. डिसेंबर २०२५ मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली. पण तुम्हाला माहीत आहे का, सोहमने हटके अंदाजात पूजाला प्रपोज केलं होतं.

सोहम बांदेकर व पूजा बिरारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि या मार्फत ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडींबद्दलच्या अपडेट चहात्यांना देत असतात. सोहम व पूजा यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे. सोहमने यावेळी प्रियाला प्रपोज करतानाचा भन्नाट किस्साही सांगितला आहे. सोहम व पूजा यांच्या प्रपोज डेच्या दिवशी नेमकं काय घडलेलं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

सोहमला काय म्हणाले होते आदेश बांदेकर?

मुलाखतीत सोहम म्हणाला, “चॅटिंग करताना एकमेकांशी बोलत असताना पूजाकडून होकारच आहे, असा अंदाज आल्यानंतर मी घरी आमच्याबद्दल सांगितलेलं; तेव्हा बाबा अमेरिकेत होता. बाबा मला रोज सकाळी कुठेतरी दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन सांगायचा की तुला शुभेच्छा, सगळं नीट कर; पण त्यावर मी काही अपडेट दिली नव्हती. मी म्हणालेलो की तिचं शूटिंग सुरू आहे, त्यामुळे भेटता येत नाहीये.”

सोहम हा किस्सा सांगत पुढे म्हणाला, “बाबांनी एक दिवस मला वॉईज नोट पाठवली की, जर तू खरा मर्द असशील तर तिच्याकडून होकार मिळवशील. मी म्हटलं बाबा हे तू काय बोलतोस. त्यावर तो म्हणाला, अरे नाही, मुलगी चांगली आहे; तू तुझ्या गोंधळामुळे चांगली मुलगी हातून घालवू नकोस.” यावेळी पूजा सुचित्रा बांदेकर यांच्याबद्दल म्हणाली, “आईचं पण असं होतं की, जे काय आहे ते स्पष्ट बोल; कारण असं नको व्हायला की दुसऱ्या कोणीतरी विचारलं आणि त्याला होकार मिळाला.” सोहम याबद्दलच पुढे म्हणाला, “कारण तिचंपण असं होऊ शकतं की अरे हा विचारतच नाहीये तर जाऊदे, त्यामुळे तिचा वाढदिवस होता तेव्हा मी तिला डिनरला घेऊन गेलो. तेव्हा माझी आई आणि माझी चुलत बहीण, जी दुबईत असते तिने मला सांगितलं की जे काय आहे ते आजच विचारून टाक. होकार दिला तर ठीक, नाहीतर नाही; पण आता जास्त ताणून धरू नकोस. सोहम पुढे म्हणाला, “त्यावेळी मला या दोघींचे मेसेजेस येत होते, पण पूजा समोर असल्याने मेसेजवर बोलणं योग्य नव्हतं. मी फक्त तिने कानातले घातल्यानंतरचा तिचा फोटो काढून पाठवला आणि तिकडे ते सगळे खूप आनंदी झाले.”

अंगठी नाही तर सोहमने पूजाला दिलेली ‘ही’ वस्तू

सोहम पुढे म्हणाला, “मी म्हटलं ठीक आहे. पण काय घेऊ. त्या म्हणाल्या ते तू ठरव. कधी नव्हे ते मी हिच्या वाढदिवसाच्या दिवशी एका दागिन्यांच्या दुकानात गेलो. पण, मला अंगठी आणि कानातले यामधला फरकच कळत नव्हता. मग त्या दुकान वाल्यांना विचारलं आणि ठरवलं की अंगठी नको, कारण अंगठी छोटी किंवा मोठी अशी साईजची समस्या होऊ शकते, त्यामुळे मी कानातले घेण्याचा निर्णय घेतला. मी तिला डिनरला घेऊन गेलो आणि तेव्हा ते कानातले दिले.”