Soham Bandekar & Pooja Birari : अभिनेत्री पूजा बिरारी व अभिनेता सोहम बांदेकर यांची जोडी सध्या चांगलीच चर्चेत असते. त्यांचे फोटो, रील्स व्हिडीओ नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सोहमने आज बायकोच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री पूजा बिरारीचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. पती सोहमने सुद्धा पूजासाठी खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसह सोहमने त्याचे अन् पूजाचे काही गोड फोटोही शेअर केले आहेत. पूजा आयुष्यात आल्यामुळे आयुष्याला एक शिस्त मिळाली, घरातली कामंही आम्ही दोघंही मिळून करत असं सोहमने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सोहम बांदेकर लिहितो, “PUBGGGGG! माझी बायको, माझी जिवलग मैत्रीण…अशी व्यक्ती जिच्यासमोर मी अगदी… ‘मी’ जसा आहे तसा राहू शकतो. आज तुझा वाढदिवस आहे पण, गेल्या काही वर्षांत तू मला प्रेम, आदर आणि अर्थातच थोडी शिस्तही भेट म्हणून दिली आहेस. तू ज्याप्रकारे अंथरुणाची घडी करून ठेवतेस, आपण मिळून स्वयंपाक करतो, नंतर संपूर्ण किचन आवरतो आणि अगदी साध्या-साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो…या सगळ्याच गोष्टींमध्ये आता माझी प्रगती झालीये, हळुहळू ही सगळी कामं मला नीट करता येत आहेत आणि हेच माझ्यासाठी सर्वात बेस्ट रिटर्न गिफ्ट आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि भविष्यातही तुझ्याकडून असेच ‘रिटर्न गिफ्ट्स’ मिळण्याची मी आतुरतेने वाट पाहत राहीन. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!”

सोहमच्या या रोमँटिक पोस्टवर पूजाने, “माय Forever…तू माझ्या आयुष्यात आहेस ही खूप मोठी गोष्ट आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय चाहत्यांनी सुद्धा सोहमने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

पूजा आणि सोहमबद्दल सांगायचं झालं तर, आदेश व सुप्रिया बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा सोहम आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी यांचा विवाहसोहळा २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात थाटामाटात पार पडला. पूजा-सोहमच्या लग्नाला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. त्यानंतर पूजा-सोहमने मुंबईत सुद्धा एक रिसेप्शन पार्टी ठेवली होती.