अभिनेत्री सोनाली बेंद्रेला २०१८ मध्ये ‘हाय-ग्रेड मेटास्टॅटिक कॅन्सर’चं निदान झालं होतं. यानंतर ती उपचारांसाठी अमेरिकेत गेली होती. या संपूर्ण काळात सोनालीला तिच्या कुटुंबाची खंबीर साथ लाभली. कॅन्सरचं निदान झाल्यावर सोनालीला प्रचंड धक्का बसला होता. पण, त्यावेळी मनीषा कोईरालाने तिला फार मदत केली. “मनीषा माझ्यासाठी मार्गदर्शक ठरली कारण, तिलाही कर्करोग झाला होता. तिचाच आदर्श मी डोळ्यासमोर ठेवला आणि कर्करोगाचा सामना केला”, असं सोनाली आवर्जून सांगते.
नुकतीच सोनालीने ‘कोण होणार करोडपती’मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी माधुरीने तिला या संपूर्ण प्रवासाबद्दल विचारलं.
माधुरी म्हणाली, “सोनाली तू आयुष्यात बरेच अनुभव घेतलेस…असा एक प्रसंग होता, जिथे तुझं संपूर्णपणे एक वेगळं रूप आम्हाला पाहायला मिळालं… जेव्हा तू कॅन्सरवर मात केलीस. त्यादरम्यान एक खंबीर सोनाली आम्हाला पाहायला मिळाली.”
यावर सोनाली म्हणाली, “खरं सांगू का? नेहमी सगळेजण म्हणतात की, कॅन्सरवर मात केली. पण, कॅन्सरवर मात करायची हे मी ठरवलं नव्हतं…मी सुरुवातीला हे जाणून घेतलं की, असं का झालं? संपूर्ण परिस्थिती शांतपणे समजून घेतली. खरंच सांगते त्या संपूर्ण प्रवासात मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मात करणं म्हणजे मला ते कुठेतरी आपल्याच शरीराशी भांडल्यासारखं वाटतं किंवा एक निगेटिव्हिटी वाटते. कारण काहीही झालं तरी ते शेवटी आपलंच शरीर आहे ना? कॅन्सरच्या पेशी सुद्धा आपल्याच आहेत. आपल्याशीच काय आपण भांडणार? त्यापेक्षा आपण आपल्या शरीरावर प्रेम करायला शिकुयात. अर्थात त्या प्रवासात खूप त्रास झाला पण, प्रेमाने सगळं सावरून पुढे जाऊयात असा निर्णय मी घेतला होता.” हे सांगताना तिचे डोळे पाणावले होते. माधुरीच्या डोळ्यातही पाणी होतं.
सोनाली आणि माधुरीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या असंख्य कमेंट्स आल्या आहेत. अभिनेता अभिजीत केळकर म्हणतो, “सोनाली मॅम…तुम्ही खरंच खूप पॉझिटिव्ह आहात…तुमच्या डोळ्यातलं पाणी सारं काही सांगून गेलं…God Bless You!”
दरम्यान, ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सुरुवात येत्या १२ ऑक्टोबरपासून होणार आहे. सोमवार ते शनिवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम सोनी मराठीवर प्रसारित केला जाईल.
