‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये आजवर अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहिले आहेत. नुकतीच या कार्यक्रमात बॉलीवूडची लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे सहभागी झाली होती. हास्यजत्रेच्या सेटवर शूटिंगदरम्यान सोनालीने सई ताम्हणकरसह एका ट्रेंडिंग मराठी गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. या दोघींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोनाली बेंद्रे आणि सई ताम्हणकर या दोघीही हास्यजत्रेच्या मंचावर प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांच्या ‘जुजबी गालावर’ या गाण्यावर थिरकल्या आहेत. “तुझ्या मी नाचलोय तालावर…आता दे गं दे जुजबी गालावर” असे या गाण्याचे बोल आहेत.

सोनाली आणि सईच्या क्यूट एक्स्प्रेशन्सनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनालीने सुंदर ऑफ व्हाइट रंगाचा ड्रेस अन् सईने साडी नेसल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या दोघींच्या बॉण्डिंगचंही नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. सोनाली बेंद्र म्हणते, “आतापासून माझा आवडता शब्द आहे ‘जुजबी”

सोनाली आणि सईच्या या क्यूट व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “दोघीही सुंदर दिसत आहेत”, “क्युट व्हिडीओ”, “सोनाली मॅम बेस्टच आहेत”, “आमच्या ग्रेट मराठी पोरी”, “आमच्या मराठी पोरी लय भारी”, “दोन सुंदर अभिनेत्री एकाच फ्रेममध्ये”, “लव्ह यू Both”, “सोनाली अजूनही आधीसारखीच दिसते”, “सई-सोनाली…सुंदर व्हिडीओ”, “प्राजक्ता माळी मिसिंग तिलाही व्हिडीओमध्ये घ्यायला पाहिजे होतं”, “जस्ट वॉव” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.