Sonali Khare and Bijay Anand Love Story : ‘चेकमेट’, ‘सावरखेड एक गाव’ अशा बऱ्याच चित्रपटांमुळे अभिनेत्री सोनाली खरे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’च्या ‘नशीबवान’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. अभिनय क्षेत्रात जम बसल्यावर वैयक्तिक आयुष्यात सोनालीने बॉलीवूड अभिनेते बिजय आनंद यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. सोनालीचे पती बिजय आनंद बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. या दोघांच्या लव्हस्टोरीची नेमकी कशी सुरुवात झाली याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

सोनाली खरे ‘द अनुरुप शो’ला दिलेल्या मुलाखतीत सांगते, “माझी अन् बिजयची भेट एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान झाली होती. मढला शूट होतं…पावसामुळे शूटिंग लांबलं आणि हळुहळू आमच्यात छान मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमातं झालं…आमच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली पण, तेव्हा सुद्धा आता आपण लगेच लग्न करुयात असा कोणताही विचार आमच्या मनात नव्हता. आम्ही लिव्ह-इनमध्ये राहत होतो…कारण, माझं तेव्हा सलग शूटिंग असायचं. त्यामुळे मग शूटिंग संपवून पुन्हा डोंबिवलीला जाणं मला खरंच जमायचं नाही. मी माझ्या कामात बिझी…बिजय त्याच्या कामात बिझी, मग पॅकअप झाल्यावर मी डोंबिवलीला जाणार या दरम्यान आम्हाला भेटायला मिळायचं नाही. यामुळेच आम्ही लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. अर्थात, माझ्या आईला या सगळ्याबद्दल माहिती होतं…मी तिला कल्पना देऊन ठेवली होती. अडीच वर्षांनी मग आईने सांगितलं…आता लग्न तरी करा किंवा मग इथेच पूर्णविराम द्या.”

बिजय आनंद याबद्दल सांगतात, “कोणत्याही नात्यात मैत्री खूप महत्त्वाची असते. जेव्हा आमच्या नात्याला अडीच-तीन वर्षे झाली तेव्हा असं जाणवलं, अरे ही नसेल तर माझं कसं होणार? आम्हाला एकत्र विविध पदार्थ बनवून खायला आवडतात, फिरायला खूप आवडतं. मग, तेव्हा विचार आला या सुंदर मैत्रीचं रुपांतर नात्यात झालं तर काय हरकत आहे?”

Award Banner

लग्नासाठी ‘प्रॅक्टिकल प्रपोजल’ म्हणजे काय?

कोणी-कोणाला प्रपोज केलं याबद्दल सांगताना बिजय म्हणाले, “आम्ही केनियाला गेलो होतो. तेव्हा ही नाश्ता करत होती…मी तिला अचानक म्हणालो, जास्त खुश नको होऊस पण, आता मी तुला जे काही विचारतोय त्याचा नीट विचार कर. जर, मला तुला तुझ्याशी लग्न करायचं असेल तर, तुझं काय म्हणणं असेल? अगदी प्रॅक्टिकल प्रपोजल होतं. कारण, मला फिरायला भयंकर आवडतं हे तिला माहितीये. म्हणून मी तिला तेव्हाच विचारलं होतं, मी ६०-७० वर्षांचा झाल्यावर जर मला वाटलं आता मी हिमालयात निघून जाणार…तर तुला चालेल का?”

यावर पुढे सोनाली म्हणाली, “त्याने मला लग्न कर असं सांगितलं नाही. त्याने मला प्रॅक्टिकली बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि मग लग्नाबद्दल माझं मत जाणून घेतलं. मी सुद्धा लगेच होकार दिला नव्हता. त्यानंतर मी याच्या प्रपोजलवर विचार केला…आम्ही मुंबईला आल्यावर मग मी लग्नासाठी होकार दिला.”

कोर्ट मॅरेज का केलं?

“मला लग्नात शोऑफ आवडत नाही. दीड हजार लोकांना बोलवून पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्रँड लग्नसोहळा करायचा हे मला पटत नाही…अर्थात जे लोक असं लग्न करतात त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण, मला तसं नव्हतं करायचं. त्यामुळे मग, सोनालीचा लग्नासाठी होकार आल्यावर आम्ही कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर जवळच्या लोकांना फक्त लहानशी पार्टी दिली.” असं बिजय आनंद यांनी सांगितलं.