मनोरंजन विश्वात काम करत असताना अनेकदा कलाकारांना मिळणारी प्रसिद्धी, ग्लॅमर याबद्दल बोललं जातं. पण त्यामागे त्यांना काहीवेळा त्यांच्या कामामुळे खासगी आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. पडद्यावर हसवणारे कलाकार काहीवेळा खऱ्या आयुष्यात अतिशय कठीण काळातून जात असतात. असंच काहीसं झालेलं ‘मोहिनी’ मालिकेतील अभिनेत्री सोनाली पंडित यांच्याबरोबर.

सोनाली पंडित सध्या ‘कलर्स मराठी’वरील मोहिनी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी व मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. मुळच्या साताऱ्याच्या असलेल्या सोनाली यांचं अभिनय क्षेत्रात कोणीही नसताना त्यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्या त्यांच्या कामाप्रती इतक्या प्रामाणिक असतात की नेहमी शूटिंगसाठी वेळेवर जातात. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एकदा त्यांच्या खासगी आयुष्यात अक्षरशा वादळ आलेलं असतानाही कामाला प्राधान्य दिलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा निर्णय घेतला.

बाबा गेले त्या दिवशी प्रयोग केला – सोनाली पंडित

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना, असं कधी झालंय का की तुमच्या आयुष्यात खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली होती पण, ते तुम्ही मेकअपमागे लपलेलं असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “२३ ऑक्टोबर २०१५ सेल्फी नाटक करत होते. नागपूरला प्रयोग होता. त्या दिवशी माझे बाबा वारले. दोन दिवसात मी तीन प्रयोग केले. बाबा गेले त्या दिवशी मी प्रयोग केला. आमच्या निर्मात्यांनी प्रयोग रद्ध करायचा आहे का असं विचारलं होतं. पण मी म्हटलं नको. हे काम आहे आपलं. आपणवचनबद्ध आहोत.”

याबद्दल सोनाली पुढे म्हणाल्या, “मला बाबांना त्या परिस्थिती पाहायचं नव्हतं. म्हणून म्हटलं आपण प्रयोग करुयात. तसंही मी दोन दिवसांपूर्वी बाबांना भेटून आले होते. त्यावेळी माझ्या मैत्रिणी इतक्या छान होत्या, सुकन्या मोने, रुजुता देशमुख, पूवा गोखले यांनी मला खूप सांभाळून घेतलं. मला माझा वेळही देत होते आणि माझ्याबरोबरसुद्धा होते. ही नाटकाची टीम माझ्याबरोबर होती.”

दरम्यान, सोनाली यांनी अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलं आहे. मराठीसह हिंदीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. गेली अनेक वर्षे त्या या इंडस्ट्रीत काम करत आहेत. सध्या त्यांची ‘मोहिनी’ ही मालिका सुरू आहे.