Sonali Pandit on Weight Loss: सोनाली पंडित सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘मोहिनी’ या मालिकेत दिसत आहे. १० वर्षांनी तिने मराठी मालिकाविश्वात पुनरागमन केले आहे. तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. या आधी ‘मॅडम सर’ मालिकेतील तिची पुष्पा ही भूमिका चांगलीच गाजली होती. ही मालिका लोकप्रिय होतीच; पण मालिकेतील पात्रांचाही मोठा चाहतावर्ग होता. आता ती ‘मोहिनी’ मालिकेत अभिनेत्रीने शालिनी ही भूमिका साकारली आहे.

आता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आहाराबद्दल वक्तव्य केले आहे. ती म्हणाली, “मी नेहमीच डब्यात मराठमोळं जेवण आणते.”

स्वत:चा फिटनेस जपण्यासाठी कोणता मंत्रा पाळते; यावर अभिनेत्री म्हणाली, “पौष्टिक खायचं. मी आता गेल्या काही महिन्यांमध्ये खूप वजन कमी केलं आहे. जिममध्ये व्यायाम केला आणि प्रोटीन डाएट केलं, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत झाली.”

    “एका ठरावीक वयानंतर…”

    अभिनेत्री पुढे म्हणाली, “एका ठरावीक वयानंतर गुडघे, कंबर दुखायला सुरुवात होते. ते सांभाळण्यासाठी मला वजन कमी करणं गरजेचं होतं. भात आणि चपाती मी शक्यतो टाळते. मी भाकरी खाते. अगदीच वाटलं तर थोडासा भात खाते. सोमवारी उपवास असतो. छोटीशी भाकरी किंवा पोळी खाऊन मी उपवास सोडते. शक्यतो मी प्रयत्न करते की, बाहेरचं खायचं नाही. माझ्या मुलीसाठीसुद्धा आम्ही रुटिन ठरवलं आहे, महिन्यातून एकदा पिझ्झा खायचा. अधे-मधे या गोष्टी पाळल्या जात नाहीत. चिट डे असतातच, पण दुसऱ्या दिवशी मी कमी खाते.”

    सोनाली पंडित साताऱ्याची आहे. तिथल्या जेवणाबद्दल अभिनेत्री म्हणाली, “आमच्याकडे कांदा-लसणाचा मसाला असतो, माझ्या सासूबाई मला वर्षभरासाठी करून देतात, तो जो घाटी मसाला असतो त्याचं जे जेवण असतं, त्याची जी चव असते ती खूप कमाल असते. कधी-कधी पोळी आणि भाकरीबरोबर त्या मसाल्यात तेल टाकायचं आणि बरोबर कांदा असेल तर चव खूप छान लागते. मी आणि माझी मुलगी ते खाण्यासाठी वेडे आहोत, आम्हाला ते भयंकर आवडतं. तो मसाला चमचमीत असतो, त्यामुळे आमच्या प्रत्येक भाजीत तो असतो. त्या मसाल्याने जेवणाला एक वेगळीच लज्जत येते.”

    दरम्यान, अभिनेत्रीच्या शालिनी या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळत असल्याचे दिसत आहे.