Sonali Patil on Rakhi Sawant: अभिनेत्री सोनाली पाटील’बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिने तिच्या खेळाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता सोनाली ‘बिग बॉस’मधील स्पर्धकांच्या खेळावर तिचे मत मांडते, कोणाचा खेळ कसा वाटतो याबद्दल बोलते.

अनेकदा चुकीच्या पद्धतीने खेळणाऱ्यांच्या, उद्धटपणे बोलणाऱ्या सदस्यांबद्दलही ती तिच्या व्हिडीओमधून व्यक्त होत असते. बिग बॉसच्या घरात नुकतीच राखी कॅप्टन झाली. त्यानंतर सोनालीने तिचे मत व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली, “या बिग बॉसच्या सीझनमध्ये पहिल्यांदा मी नि:शब्द झाले आहे. राखी कॅप्टन झाली आहे. यावर मला विश्वास बसत नाहीये आणि राखीलाही यावर विश्वास बसत नाहीये. राखी इतक्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. पण, ती बिचारी कधीच कॅप्टन झाली नाही.”

“ती कॅप्टन झाल्यानंतर संपूर्ण घराला…”

“राखीलाच विश्वास बसत नाहीये की ती कॅप्टन झाली आहे. तिनं कधीच हिंदी किंवा मराठीमध्ये इतक्या गांभीर्याने कुठलाच टास्क केला नाही. आयुष्यात पहिल्यांदा सगळे तिला पाठिंबा देत होते. ती कॅप्टन झाल्यानंतर संपूर्ण घराला आनंद झाला आहे. मला वाटतं की घरालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे. मला तर खूप आनंद झाला आहे. राखी स्वत: म्हणत असेल की मी इतके सीझन केले, पण मी कॅप्टन झाली नाही.

पुढे ती म्हणाली, “मराठी माणसं खरंच चांगली आहेत. घरातील माणसंही खरंच चांगली आहेत, असं म्हणायला हरकत नाही. राखीला कॅप्टन केलं. मी तर खूश आहेच त्याचवेळी मी नि:शब्दही आहे.”

सोनालीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “राखीमुळे बिग बॉस बघावं वाटत आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “आम्हालासुद्धा खूप आनंद झाला”, एकाने लिहिले, “राखी खूश तर आम्हीसुद्धा खूश आहे. तिच्यामुळे तर शो बघायला चालू केला.”

एकाने लिहिले, “मला राखी आवडते. ती मनाने चांगली आहे. पण, विचित्र परिस्थितीमुळे बाहेर वेड्यासारखी वागते. तिच्यात खूप टॅलेन्ट आहे आणि त्या मानाने तिला मराठी बिग बॉसमध्येही आदर मिळतो”, अशा अनेक कमेंट्स करत प्रेक्षकांनी राखी सावंतचे कौतुक केले आहे.

राखी याआधी हिंदीसह मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. ती ज्या पद्धतीने स्पर्धकांशी बोलते, त्यांच्याशी मैत्री करते, भांडते, लोकांना आरसा दाखवते, त्यामुळे राखी जेव्हा बिग बॉसच्या कोणत्याही सीझनमध्ये येते, तेव्हा ती प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करते.

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यानंतर चार वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली. त्यातील पहिली वाईल्ड कार्ड राखी सावंत आहे. दरम्यान, आता खेळात पुढे काय ट्विस्ट येणार, राखीच्या कॅप्टन्सीमध्ये काय गमती जमती घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.