Sonali Raut Opens Up About Her Shocking Experience on Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’ सीझनचा ग्रँड फिनाले आता जवळ आला आहे. त्यामुळे या पर्वाचं विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहामधील स्पर्धक सोनाली राऊतने तिचा ‘बिग बॉस मराठी’बद्दलचा अनुभव सांगितला आहे. यावेळी तिने रितेश देशमुखबद्दलही वक्तव्य केलं आहे.

सोनाली राऊतने आतापर्यंत हिंदीत बरंच काम केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये येण्यापूर्वी तिने ‘बिग बॉस’ हिंदीतही सहभाग घेतला आहे.  अशातच आता तिने ‘शुद्ध मनोरंजन’ला दिलेल्या मुलाखतीत ‘बिग बॉस मराठी’मधील अनुभव सांगितला आहे. सोनालीने यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात असताना तिला खूप अडचणींना सामोरे जावं लागलं असं म्हटलं आहे. सोनाली नेमकं काय म्हणाली याबद्दल जाणून घेऊयात…

सोनाली राऊतने सांगितला अनुभव

सोनाली म्हणाली, “मला मराठीमध्ये काम करण्याची चांगली संधी मिळाली. पण, मी जेव्हा बिग बॉसच्या घरात गेले तेव्हा मला वेगळा अनुभव आला. चौथ्या-पाचव्या दिवशीच मला इन्फेक्शन झालं. पुढे ते खूपच वाढलं आणि जेव्हा चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसू लागला तेव्हा मला खूप काळजी वाटली. मी त्यांच्या डॉक्टरला सांगितलं पण, त्यांना काही कळलं नाही.”

सोनाली पुढे म्हणाली, “बिग बॉस मराठीचं घर हिंदी बिग बॉसच्या तुलनेत छोटं आहे. आम्ही १७ स्पर्धक होतो आणि वॉशरूम पण खूप छोटं होतं. यावर्षीची थीम रेशनवर होती. त्यामुळे आम्हाला जेव्हा शिक्षा व्हायची तेव्हा रेशन कमी केलं जायचं, खाली झोपायला सांगायचे. त्या घरात खूप मोठे उंदीर होते. वीकेंडच्या वारला हिंदीत सलमान खान त्यांच्यातर्फे सगळ्यांना जेवण पाठवतात. पण, मराठीत प्रोडक्शन पाठवत होतं. पण, दुर्दैवाने त्या जेवणात झुरळं असायची. मला कळलंच नाही की प्रोडक्शनची चूक होती की काय पण आम्हाला प्राण्यांसारखं आतमध्ये टाकलं होतं.”

रितेशबद्दल सोनालीचं वक्तव्य

सोनालीला रितेशबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी ग्रेट ग्रँड मस्तीमध्ये त्याच्याबरोबर काम केलं आहे. आम्ही संपर्कातही होतो. मला आनंद होता की रितेश देशमुख होस्ट करत आहे. पण, त्याची होस्टिंग मला काही कळलीच नाही. पण, ज्या रितेशला मी ओळखते तो तिथे खूपच वेगळा होता. पहिल्या एपिसोडमध्ये तो खूप रागावलेला आणि सगळ्या स्पर्धकांवर ओरडत होता. आम्हाला त्यामागचं कारण कळेना. तो सतत आमच्यावर ओरडायचा. घरातून काढून टाकणार असं बोललं जायचं.”

सोनाली पुढे म्हणाली, “मी बाहेर पडण्याआधीच मला त्रास होत आहे तुम्ही तर काही करत नाही आहात मग मीच बाहेर जाते असं म्हटलं होतं. त्यानंतर सुदैवानं माझी एक्झिट झाली. मी खूप आनंदी होते. मी याबद्दल रितेशला सांगितलं होतं. पण, त्याने काहीच केलं नाही. सलमान असते तर त्यांनी निदान काहीतरी केलं असतं.”