Bigg Boss Marathi 6 Sonali Raut : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये यावर्षी अभिनेत्री व सुपर मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनाली राऊतने एन्ट्री घेतली होती. अवघ्या काही दिवसांतच सोनाली शोमधून बाहेर आली. मात्र, घराबाहेर आल्यावर सोनालीने ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाबत, घरातील अस्वच्छतेबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय अस्वच्छतेमुळे स्केबीज झाल्याचा दावा तिने अनेक मुलाखतींमध्ये केला होता.

सोनालीने अंगावर पुरळ, लाल चट्टे उमटल्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

सोनाली म्हणते, “रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालायचा असं नाही. मी खूप विश्वासाने ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात प्रवेश केला होता. पण, मला या घरात वेगळाच अनुभव आला. घरातील अस्वच्छ परिस्थितीमुळे मला स्केबीज (Scabies) हा त्वचेचा संसर्ग झाला. स्वयंपाकघरात उंदीर होते, झुरळं होती…या सगळ्यामुळे प्रचंड त्रास झाला. या ग्लॅमरच्या पलीकडचं हे भीषण वास्तव आहे. मला टॉवेल, रेझर यांसारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तूही शेअर कराव्या लागल्या. यामुळे स्किन इन्फेक्शन झालं. आपल्यापैकी कोणालाही अशाप्रकारे करिअर आणि आरोग्यापैकी एकाची निवड करावी लागू नये.”

या पोस्टसह सोनाली राऊत काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या पाठीवर आणि पायावर सर्वत्र पुरळ आणि लाल चट्टे आल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सोनालीने शेअर केलेल्या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिला पाठिंबा देत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर, काही नेटकऱ्यांनी आता “दोन महिन्यांनी तू ही पोस्ट का शेअर केलीस” असे प्रश्नही तिला कमेंट्समध्ये विचारले आहे.

bigg boss marathi sonali raut
Bigg Boss Marathi 6 : सोनाली राऊतची पोस्ट

आता ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद यांच्यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.