Sonarika Bhadoriya Pay Disparity: ‘देवों के देव…महादेव’ मालिकेत देवी पार्वतीची भूमिका साकारून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया सध्या मालिका विश्वापासून दूर आहे. पण तिने एका मुलाखतीत वाईट अनुभव सांगितला आहे. तिने टीव्ही मालिका आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील मानधनातील असमानतेवर थेट भाष्य केलंय. मानधन वाढवून मागितल्याच्या कारणावरून तिला एका मालिकेतून काढून दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आलं, असं तिने सांगितलं.

सोनारिकाने मालिकेचं, कलाकारांचं किंवा निर्मात्यांचं नाव घेतलं नाही. ती या मालिकेत वर्षभर काम करत होती आणि त्या मालिकेचा टीआरपी खूप वाढला होता, असं तिने हॉटरफ्लायशी बोलताना सांगितलं. “जीआरपी सोडून द्या, टीआरपी इतका जबरदस्त होता की चॅनेलने आम्हाला पार्टी दिली होती. अशा वेळी तुम्ही कौतुकाची किंवा मानधन वाढण्याची अपेक्षा करता. पण यावर त्यांनी मला विचारलं, ‘नाही, तू कोणत्या आधारावर पगारवाढ मागत आहेस?’”

अभिनेत्याचा पगार तिप्पट वाढवला

सोनारिकाने सांगितलं की, त्याच मालिकेतील मुख्य अभिनेत्याने मालिका सोडण्याची धमकी दिली, तेव्हा त्याचं मानधन तीन पटीने वाढवण्यात आलं. प्रॉडक्शन टीममधील एका व्यक्तीकडून तिला दोघांच्या पगारातील फरकाबद्दल समजलं. “मानधन वाढवून मागितल्यामुळे मला मालिकेतून काढून टाकलं. मला हेसुद्धा माहीत नव्हतं की माझी जागा दुसऱ्या कुणालातरी दिली जात आहे. जेव्हा टीआरपी जास्त असायचा, तेव्हा तो अभिनेता मालिका सोडण्याची धमकी द्यायचा, त्यामुळे त्यांनी त्याचं मानधन तीन पटीने वाढवलं, पण माझं मानधन एकदाही वाढवलं नाही,” असं सोनारिका भदोरिया म्हणाली.

दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही मानधनात असते तफावत

सोनारिकाने हिंदी मालिकांबरोबरच ‘जादूगाडू’, ‘स्पीडुन्नोडू’ आणि ‘ईडो रकम आडो रकम’ यांसारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. ‘इंद्रजित’ नावाचा तमिळ सिनेमाही तिने केला होता. दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही अभिनेता व अभिनेत्रींच्या मानधनात मोठी तफावत असल्याचं तिने सांगितलं. अगदी नवख्या अभिनेत्यालाही भरघोस मानधन दिलं जायचं, कारण प्रेक्षक त्यांना हिरो मानायचे. दुसरीकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव असूनही अभिनेत्रींना कमी मानधन दिलं जायचं, असं सोनारिकाने नमूद केलं.

‘तुम देना साथ मेरा’, ‘देवों के देव…महादेव’,  ‘इश्क में मरजावां’, ‘पृथ्वी वल्लभ: इतिहास भी, रहस्य भी’ आणि ‘दास्तान-ए-मोहब्बत: सलीम अनारकली’ या मालिकांमध्ये काम करणारी सोनारिका सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. तिने फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यावसायिक विकास पराशरशी लग्न केलं. २०२५ मध्ये तिला मुलगी झाली. सध्या सोनारिका मुलीबरोबर वेळ घालवतेय.