Diksha Pawar MTV Splitsvilla 16 controversy : रिअॅलिटी शोमुळे अनेकदा सेलिब्रिटी चर्चेत येतात. पण, काहीवेळा काही जण रिअॅलिटी शोमधील त्यांचा अनुभव सांगताना नाराजीही व्यक्त करतना दिसतात. अशातच आता ‘एमटीव्ही’वरील ‘स्प्लीट्सव्हिला’ सीझन १६ मध्ये सहभागी झालेल्या दिक्षा पवार हिनेसुद्धा या शोबद्दल बोलताना काही आरोप केले आहेत आणि तिचा अनुभव सांगितला आहे. ज्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.
‘एमटीव्ही’वरील ‘स्प्लिट्सव्हिला’ सीझन १६च्या काही स्पॉइलर्स दिक्षा पवारने शेअर केल्यानंतर शोच्या मेकर्सनी तिच्यावर कायदेशीर कारवाई केल्याचं समोर आलं आहे. दिक्षा पवारने स्वतः तिच्या स्नॅपचॅट स्टोरीमधून सांगितलं की तिला मेकर्सकडून नोटीस मिळाली आहे. मात्र, तिने सांगितलं की तिला या कारवाईची भीती नाही. तसंच तिने मेकर्सवर बॉडी शेमिंग केल्याचा आरोपही केला आहे.
दिक्षा काय म्हणाली?
दिक्षा पवारने तिच्या स्नॅपचॅट स्टोरीमधून म्हटलं की, “मेकर्सना असं वाटतंय की मला नोटीस पाठवली तर मी घाबरून जाईन”. तिने पुढे आरोप केला की तिला बोलण्यासाठी आग्रह करण्यात आला. ती म्हणाली, “तुम्ही ज्याला बॉडी शेम करत आहात… मी सांगते MTV काय आहे. शोमध्ये मी जे केलं त्याबद्दल काहीही बोलू शकतात. पण मी जे केलं ते दाखवायला हवं.”
दिक्षा पवारने पुढे सांगितलं की तिच्या एक्सने त्यांच्या रीलवर कमेंट केली होती. त्यानंतर MTV कडून असं उत्तर देण्यात आलं की, ‘आम्हाला वाटलं होतं की तुम्ही घोड्यांबद्दल काहीतरी बोलाल.’ यावर ती खूप संतापली आणि म्हणाली, “म्हणजे खरंच, तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकता का?” तिने सांगितलं की फक्त स्पर्धकच नाही तर चॅनलही तिच्याविरुद्ध वागत आहे. ती पुढे म्हणाली, “पण MTV ला काय वाटतं, की तुम्ही हे सगळं विसरून स्वतःचा अपमान, इज्जत घालवून पुन्हा फायनलमध्ये परत यावं?” दिक्षा पवारने पुढे मेकर्सना प्रश्न विचारला, “जर तुमचा स्वाभीमान इतकाच महत्त्वाचा होता, तर मला का कॉल करत होतात?”
तिने मान्य केलं की ती प्रत्येक ठिकाणी बरोबर नव्हती, पण तिचे काही चांगले क्षण शोमध्ये दाखवले गेले नाहीत असंही ती म्हणाली. तिने चॅनेलवर स्पर्धकांना ट्रोल केल्याचाही आरोप केला आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जात नाही असं म्हटलं. ती म्हणाली, “जर एखादा व्यक्ती मरत असेल तरी तुम्हाला फरक पडत नाही, तुम्हाला फक्त टीआरपी हवा आहे.” तिने शेवटी मेकर्सना अधिक माणुसकीने वागण्याचं सल्ला दिला.
