‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील १५ नायिका यंदा एकत्र येऊन महावटपौर्णिमा साजरी करणार आहेत. यानिमित्ताने सायली, जानकी, अबोली, मंजिरी, नंदिनी, काव्या, शुभा अशा सगळ्या नायिकांनी सेटवर एकत्र येऊन शूट केलं. या महावटपौर्णिमेचं शीर्षक गीत सुद्धा वाहिनीकडून प्रदर्शित करण्यात आलं आहे. यामध्ये सगळ्या नायिका एकत्र येऊन या वटपौर्णिमेच्या शीर्षक गीतावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यानचा एक BTS व्हिडीओ जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नृत्य दिग्दर्शक कलाकारांना डान्स करताना काही सूचना देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी नायिकांना गोल फिरवा अशी सूचना दिग्दर्शक सगळ्या नायकांना देतात. यानंतर ही सगळी जोडपी एकत्र डान्स करतात आणि शेवटी दिग्दर्शक सांगतात, “आता हसत राहा…” यानंतर जोडप्यांनी एकमेकांकडे पाहून गोड हसणं अपेक्षित असतं. पण उपस्थित सगळे कलाकार सेटवर मोठ्याने हसु लागतात. हा पडद्यामागचा व्हिडीओ सायलीने शेअर केला आहे.

सायली म्हणते, “कोरिओग्राफरने टेकमध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही सगळे हसा… आणि आम्ही बघा कसे हसतोय…” सगळेच कलाकार नॉनस्टॉप हसू लागल्यावर नृत्य दिग्दर्शक सेटवरून मागे निघून गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच सायलीने शेअर केलेल्या BTS व्हिडीओमध्ये सगळ्याच नायिकांचं एकमेकींशी उत्तम बॉण्डिंग असल्याचं पाहायला मिळत आहे.

सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी पुढे म्हणाली, “हा फक्त महासंगम आहे असं मी म्हणणार नाही. महावटपौर्णिमेच्या निमित्ताने खूप चांगला उपक्रम स्टार प्रवाह वाहिनी राबवत आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपण प्रत्येकानेच जायला हवं. वटपौर्णिमा सण आपल्याला हेच शिकवतो. या विशेष भागातूनही आपल्या रुढी, परंपरा आणि निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा पाहायला मिळेल. झाडांचं संवर्धन करण्यासाठी कशा १५ नायिका एकत्र येऊन लढा देतात याची छान गोष्ट गुंफण्यात आली आहे. या निमित्ताने वडाच्या झाडाजवळ ४ दिवस शूट करता आलं. आम्ही सगळ्या नायिका एकत्र होतो. शूट करताना खूपच मजा आली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महानायिकांची महावटपौर्णिमा हा विशेष भाग प्रेक्षकांना ८ जूनला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.