Star Pravah Serial TRP : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आधारावर ठरवली जाते. त्यामुळे टीआरपी वाढवण्यासाठी विविध मालिकांमध्ये सतत काही ना काही ट्विस्ट येतात. अनेकदा नव्या कलाकारांच्या एन्ट्री केल्या जातात. तर, काही वेळा मालिकांमध्ये लीप आणला जातो. गेली तीन वर्षे या टीआरपीच्या शर्यतीत सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका वर्चस्व गाजवतेय.
‘ठरलं तर मग’ मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे ही मालिका ८:३० वाजताची स्लॉट लीडर सुद्धा असते. सध्या ही मालिका पाऊण तास प्रसारित केली जाते. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका.
‘स्टार प्रवाह’च्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘तू ही रे माझा मितवा’ या दोन्ही मालिका गेली काही महिने स्लॉट लीडर ठरत आहेत. पण, या आठवड्यात ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सगळ्याच मालिकांनी चांगली कामगिरी केली आहे. सध्या वाहिनीवर एकूण १३ मालिका सुरू आहेत आणि या तेराही मालिका स्लॉट लीडर ठरल्या आहेत.
टीआरपीच्या आकडेवारीत ‘स्टार प्रवाह’च्या सगळ्याच मालिकांनी बाजी मारली आहे. ‘BARC इंडिया’च्या रिपोर्टनुसार, २०२६ च्या नवव्या आठवड्यात स्टार प्रवाहच्या १३ मालिका स्लॉट लीडर ठरल्या आहेत. वाहिनीने अधिकृत पोस्ट शेअर करत सगळ्या मालिकांच्या टीमचं भरभरून कौतुक केलं आहे.
स्टार प्रवाह वाहिनी पोस्ट शेअर करत लिहिते, “प्रत्येक स्लॉट नंबर १! चांगलं कथानक, अचूक रणनीती आणि प्रेक्षकांचं भरपूर प्रेम यामुळे स्टार प्रवाहने ही कामगिरी केली आहे. आमचे प्रेक्षक आणि आमच्या सगळ्या टीमचे आम्ही ऋणी आहोत. भविष्यात यशाचे असे अनेक टप्पे पार करायचे आहेत.”
नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “खूप अभिनंदन”, “सगळ्या मालिका स्लॉट लीडर ठरल्या मोठी गोष्ट आहे”, “ठरलं तर मग पाऊण तास आहे…त्यामुळे बराच फायदा झाला” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.
दरम्यान, आता स्टार प्रवाहचा पुरस्कार सोहळा १५ मार्चला पार पडणार आहे. यामध्ये कोणत्या मालिका बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
