Star Pravah Anandi Serial Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच ‘आनंदी’ या नव्या मालिकेची घोषणा केली होती. यामधून नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर मालिकाविश्वात पदार्पण करतेय. ‘आनंदी’च्या पहिल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना मुख्य नायिका जाई खांडेकरच्या सोबतीला आलापिनी निसळ आणि पयोष्णी ठाकूर या दोन अभिनेत्रींची झलक पाहायला मिळाली होती. पण, या व्यतिरिक्त ‘आनंदी’ मध्ये कोण-कोण झळकणार हे आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. अखेर नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोतून ‘आनंदी’ मालिकेची दमदार स्टारकास्ट सर्वांसमोर रिव्हिल झाली आहे.

‘आनंदी’ मालिकेत लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि अभिनेते समीर धर्माधिकारी एकत्र झळकणार आहेत. ‘आनंदी’ची नेमकी कथा काय आहे? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…

आत्माराम जाधव म्हणजेच आबा इचलकरंजीत आपल्या तीन नातींसोबत राहतात. त्यांची मुलगी वसुधा आणि जावई हे एका अपघातात गेले. तीन नातींसाठी त्यांनी स्वतःला या धक्यातून सावरलं आणि उतार वयातही जोमाने काम करायची धडपड सुरू ठेवली. ते युगंधरच्या मिलमध्ये काम करतात. ‘आनंदी’ला दृष्टी नसली तरी आबांनी आयुष्य बघायचा दृष्टीकोन तिला दिलाय. आबांचं एकच स्वप्न आहे ते म्हणजे तिघी नातींनी शिकावं, स्वत:च्या पायावर उभं राहावं आणि त्यांचं चांगल्या घरात लग्न व्हावं.

आता ऐनवेळी युगंधर निंबाळकर आत्माराम जाधवांच्या नातीशी म्हणजेच आनंदीशी लग्न करण्यास तयार होतात. या दोघांच्या वयातही बरंच अंतर आहे, आता खरंच यांचं लग्न होणार का? याचा उलगडा मालिका सुरू झाल्यावर होईल.

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता रोहित परशुराम ‘आनंदी’मध्ये मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे. याबद्दल त्याने काही दिवसांपूर्वी स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. मात्र, या प्रोमोमध्ये रोहितशी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळालेली नाहीये.

‘आनंदी’ मालिकेला ‘स्टार प्रवाह’ने प्राइम स्लॉट दिला आहे. येत्या ३० मार्चपासून दररोज रात्री ८ वाजता ही मालिका प्रसारित केली जाईल. आता मालिकेला प्राइम स्लॉट दिल्याने आठ वाजता प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे. ही मालिका आता साडेसात वाजता प्रसारित केली जाईल. शिवानी बावकरची ‘साधी माणसं’ ऑफ एअर होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. ‘साधी माणसं’ ऑफ एअर होऊ शकते किंवा या मालिकेची वेळ बदलली जाईल.