Star Pravah New Serial : साडेपाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरु होणार आहे मनोरंजनाचं नवं आख्यान. नुकतीच या वाहिनीने तब्बल आठ नव्या कार्यक्रमांची घोषणा केली आहे. ‘पाठराखीण’, ‘सुना येती घरा’, ‘विसरू नको तू मला’, ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’, ‘मराठी मिडीयम’, ‘मी कात टाकली’, ‘आता होऊ दे धिंगाणा ५’ आणि ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२६’ अशा तब्बल ८ कार्यक्रमांची प्रवाह गर्जना नुकतीच करण्यात आली आहे. यात ६ मालिका अन् २ कार्यक्रमांचा समावेश आहे.
१. ‘पाठराखीण’ मालिका
‘पाठराखीण’ ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहाणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची. बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘ठरलं तर मग’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ यांसारख्या सुपरहिट मालिका देणारी निर्मिती संस्था अर्थात सोहम प्रोडक्शन्स या मालिकेची निर्मिती करत आहे. प्राजक्ता गायकवाड, गौरी इंगवले, शुभंकर तावडे, आशय कुलकर्णी, अदिती देशपांडे, मिताली जगताप, शकुंतला नरे, रमेश वाणी, दीप्ती लेले असे अनेक दमदार कलाकार या मालिकेत आहेत. विघ्नेश कांबळे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
२. ‘सुना येती घरा’ मालिका
‘सुना येती घरा’ ही मालिका दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची आणि नव्या नात्यांनी घडणाऱ्या बदलांची कथा उलगडणार आहे. अशोक शिंदे, मेघना वैद्य, दीपा परब, शर्मिष्ठा राऊत, सत्यजीत साळोखे, शुभम पडे, सिद्धव साळोखे, मनोज कोल्हटकर असे अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत आहेत.
३. ‘विसरु नको तू मला’ मालिका
‘विसरु नको तू मला’ एक उत्कट प्रेमकथा आहे. आपल्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारा नायक आणि आपल्या स्वप्नांबरोबर या सच्च्या प्रेमाला सोबत घेऊन जाणारी नायिका यांची ही गोष्ट असणार आहे. तन्वी मुंडले, शाल्व किंजवडेकर,शृजा प्रभुदेसाई, शर्वाणी पिल्लई, राजेंद्र शिसाटकर, सिद्धार्थ खिरिड असे अनेक लोकप्रिय कलाकार या मालिकेत आहेत. निर्माते आणि लेखक सचिन दरेकर यांनी मालिकेची कथा लिहिली आहे.
४. ‘मराठी मीडियम’ मालिका
चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळी या लेखक दिग्दर्शक जोडीने आजपर्यंत अनेक दर्जेदार आणि सुपरहिट मालिका दिल्या आहेत. हीच लेखक दिग्दर्शकाची जोडी आता घेऊन येतेय मराठी अस्मिता टिकवणाऱ्या मराठी मीडियमची गोष्ट. मालिकेत मुख्य भूमिकेत श्रद्धा पवार ( लोकप्रिय इन्फ्लुएन्सर ) आणि अक्षय नलावडे झळकणार आहेत.
५. ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिका
‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय त्यांनी आजवर ज्या-ज्या मालिकांमध्ये काम केलंय, त्या सगळ्या सिरियल गाजल्या आहेत. एका सामान्य शिक्षिकेची, तिच्या कुटुंबाची आणि तिच्या मुलींची गोष्ट सांगणारी ही मालिका असणार आहे. मुख्य भूमिकेत ऐश्वर्या नारकर असल्यामुळे या मालिकेला नक्कीच दमदार टीआरपी मिळणार असा अंदाज चाहत्यांनी याची पहिली झलक पाहूनच बांधला आहे.
६. ‘मी कात टाकली’ मालिका
चमत्कारिक, गूढ, रहस्यमय आणि नाट्यमय कथांचा एक खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांच्याही मनोरंजनासाठी स्टार प्रवाह सज्ज आहे, आणि म्हणूनच या मनोरंजनाच्या आख्यानात येणारी पुढची मालिका म्हणजे मी कात टाकली. संतोष अयाचित या मालिकेती निर्मिती करणार आहेत. यातील कलाकारांची नावं सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
७. ‘आता होऊ दे धिंगाणा’ सीझन ५ – कार्यक्रम
मालिकांमध्ये कितीही सोशिक, रागीट, प्रेमळ अशी कोणतीही भूमिका असली तरी एक असं ठिकाण आहे जिथे हे सगळे मुखवटे गळून पडतात आणि प्रत्येक कलाकार कसा धिंगाणेबाज आहे हे जिथे कळतं तो कार्यक्रम म्हणजे ‘आता होऊ दे धिंगाणा’. या कार्यक्रमात आता पाचपट मजा येणार, पाचपट धिंगाणा होणार. कारण हा असणार आहे ‘आता होऊ दे धिंगाणा’चा पाचवा सीझन.
८. ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव’ २०२६ – कार्यक्रम
भव्य दिव्य सोहळे ही स्टार प्रवाहची खासियत आहे. त्याच साखळीतला पुढचा सोहळा म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणारा महाराष्ट्राचा लाडका सोहळा. यंदा पुन्हा त्याच जोशात साजरा होईल ज्याचं नाव आहे ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२६’.
दरम्यान, आता या ८ कार्यक्रमांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, याचा टीआरपीवर काय परिणाम होणार हे येत्या काळात प्रेक्षकांसमोर स्पष्ट होईल.
