Star Pravah Parivar Puraskar 2026 : ‘स्टार प्रवाह’च्या पुरस्कार सोहळ्यात गेली दोन वर्षे सलग सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका बाजी मारत होती. टीआरपीमध्ये आघाडीवर असल्याने ही ‘महाराष्ट्राची महामालिका’ म्हणून ओळखली जाते. यंदा ‘ठरलं तर मग’च्या संपूर्ण टीमकडे सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून हॅटट्रिक करण्याची संधी होती. पण, अगदी थोड्यासाठी ही संधी हुकली आहे. कारण, यावर्षी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही ‘महाराष्ट्राची महामालिका’ ठरली आहे.

खरंतर, ‘ठरलं तर मग’ मालिका सलग ३ वर्षे… हजार एपिसोड्सचा टप्पा ओलांडूनही टीआरपीमध्ये टॉप करतेय, अशा मालिकेला या संपूर्ण सोहळ्यात फक्त एकच पुरस्कार मिळाल्याने चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. “स्टार प्रवाह’ने हा सोहळा कसा वाटला?” असा प्रश्न विचारत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यावर ‘ठरलं तर मग’च्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत नाराजी व्यक्त केली आहे.

“काहीही झालं तरी आमच्यासाठी ‘ठरलं तर मग’ महाराष्ट्राची महामालिका आहे” असं या प्रेक्षकांचं म्हणणं आहे. अशा असंख्य कमेंट्स ‘स्टार प्रवाह’च्या पोस्टवर आल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी अर्जुनला या सोहळ्यात एकही पुरस्कार मिळाला नाही याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली या एकाच सदस्याला यावर्षी ‘सर्वोत्कृष्ट सून’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अन्य कोणताही पुरस्कार या टीमला मिळालेला नाहीये. त्यामुळे या सिरियलचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.

“अर्जुन निदान एक तरी पुरस्कार डिझर्व्ह करतो…गेल्यावर्षी सुद्धा त्याला अवॉर्ड दिलं नव्हतं…हे बरोबर नाहीये”, “ठरलं तर मग’ ही तुमची टीआरपी टॉपर मालिका आहे आणि आज स्टार प्रवाह नंबर वन याच मालिकेमुळे आहे…त्याच मालिकेला अवॉर्ड दिलं नाहीये”, “ठरलं तर मग’च्या टीमकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं…सायली-अर्जुन खूप काही डिझर्व्ह करतात”, “आमच्यासाठी महामालिका ‘ठरलं तर मग’ आहे”, “टीआरपी चांगला आहे…४५ मिनिटांचे एपिसोड्स सुरू आहेत आणि या कलाकारांना पुरस्कार दिला नाही…हे लोक अवॉर्ड डिझर्व्ह करतात”, “अर्जुनचा तो ५० पानांचा कोर्ट सीन त्याला तोड नाही…तरीही पुरस्कार दिला नाहीये”, “सलग ३ वर्षे टीआरपीमध्ये आघाडीवर असणं ही सोपी गोष्ट नाहीये” अशा असंख्य कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत.

ttm audience upset
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, सायली-अर्जुन आणि ‘ठरलं तर मग’चे चाहते हा सोहळा पार पडल्यावर प्रचंड नाराज झाले आहेत. यावर्षी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत.

‘ठरलं तर मग’ मालिकेला गेल्यावर्षी सुद्धा फक्त दोनच पुरस्कार मिळाले होते. खरंतर, या मालिकेची लोकप्रियता प्रचंड आहे. ज्यावेळी साक्षी शिखरे आणि प्रियाला शिक्षा झाल्याचा संपूर्ण कोर्ट सीन सुरू होता. त्यावेळी या मालिकेला आजवरचा रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळाला होता. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून ही मालिका टीआरपीच्या कारणास्तव आणि स्टार प्रवाहचा रात्री नऊ वाजताचा स्लॉट लीड करण्यासाठी पाऊण तास प्रसारित केली जाते. अशा परिस्थितीत मालिकेतील मुख्य जोडी आणि संपूर्ण टीमला सन्मान म्हणून एक तरी पुरस्कार मिळणं गरजेचं आहे.