Star Pravah Parivar Puraskar 2026 : सध्या सर्वत्र ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरू आहे. दरवर्षी हा भव्यदिव्य सोहळा मार्च महिन्यात आयोजित केला जातो. ‘स्टार प्रवाह’च्या विविध मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा या सोहळ्यात सन्मान केला जातो. यंदाच्या वर्षी सुद्धा ‘ठरलं तर मग’, ‘तू ही रे माझा मितवा’ या टीआरपी टॉपर मालिकांसह अन्य नव्या मालिकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे.
‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण येत्या १५ मार्चला वाहिनीवर संध्याकाळी सात वाजता करण्यात येणार आहे. यावर्षी आपल्या आवडत्या कलाकारांना कोणकोणते पुरस्कार मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली आहे. अशातच ‘स्टार प्रवाह’च्या एका नायकाने त्याला कोणता पुरस्कार मिळालाय हे आधीच सोशल मीडियावर रिव्हिल केलं आहे.
‘स्टार प्रवाह’वर ‘तुझ्या सोबतीने’ ही नवीन मालिका अलीकडेच जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री एतशा संझगिरी यांची फ्रेश जोडी एकत्र झळकतेय. अजिंक्यला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य – पुरुष’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर ट्रॉफीसह फोटो शेअर करत अभिनेत्याने पुरस्कार मिळाल्याची ही गुडन्यूज त्याच्या तमाम चाहत्यांना दिली आहे. या पुरस्कारासाठी अजिंक्यने ‘स्टार प्रवाह’च्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
अजिंक्य ननावरेच्या या पोस्टवर त्याची पत्नी शिवानी सुर्वेने सुद्धा खास कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. याशिवाय चाहत्यांनी सुद्धा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, अजिंक्य ननावरेबद्दल सांगायचं झालं तर, ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेत तो ‘मल्हार’ ही भूमिका साकारत आहेत. त्याच्यासह या मालिकेत एतशा संझगिरी, माधवी निमकर, भक्ती रत्नपारखी, पूजा नायक या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. वैयक्तिक आयुष्यात अजिंक्यने फेब्रुवारी २०२४ मध्ये शिवानी सुर्वेशी लग्न केलं. शिवानीच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
