‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६’ या सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांना आपल्या कामाची पोचपावती या पुरस्कार सोहळ्यांमधून मिळत असते. सर्वोत्कृष्ट मालिका, जोडी, अभिनेता-अभिनेत्री याचबरोबरीने ‘सर्वोत्कृष्ट मुलगी’ हा पुरस्कार देखील वाहिनीकडून प्रदान केला जातो. यावर्षी कृष्णा, नंदिनी-काव्या, ईश्वरी, गिरिजा, ऊर्जा आणि नुपूर या नायिकांना ‘सर्वोत्कृष्ट मुलगी’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. आता यांच्यापैकी बेस्ट मुलगी कोण ठरणार याचा उलगडा १५ मार्चला होईल. पण, त्याआधी यादरम्यानचा एक खास प्रोमो प्रेक्षकांसमोर आलेला आहे.
‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याला यावर्षी कलाकारांच्या कुटुंबीयांनी देखील उपस्थिती लावली होती. ‘सर्वोत्कृष्ट मुलगी’ हा पुरस्कार प्रदान करण्याआधी नायिकांच्या खऱ्या कुटुंबीयांशी यावेळी संवाद साधण्यात आला.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचे आई-बाबा देखील या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. होस्ट अभिजीत खांडकेकर यावेळी म्हणाला, “आपल्या नायिकांचे पालक इथे उपस्थित आहेत. ज्ञानदाचे बाबा तुम्ही सांगा खरंच ही सर्वोत्कृष्ट मुलगी आहे का?”
ज्ञानदा सर्वांना म्हणाली, “एकतर मी सकाळी खूप लवकर उठते…” यावर तिचे बाबा लेकीची पोलखोल करत लगेच म्हणाले, “हे सगळ्यात मोठं खोटं आहे.” यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ज्ञानदाची आई सुद्धा हसत होती.
पुढे, अभिनेत्री म्हणाली, “मी माझ्या आई-बाबांसाठी छान नाश्ता आणि अप्रतिम, साग्रसंगीत स्वयंपाक करते.” लेकीचं हे उत्तर ऐकून तर ज्ञानदाच्या बाबांनी हसत-हसत डोक्यावर हात मारला आणि हे खोटं असल्याचं सर्वांना सांगितलं. शेवटी ज्ञानदाला स्वत:ला देखील हसू अनावर झालं होतं. हा भन्नाट प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “बाबांचा आत्मविश्वास आवडलाय”, “सत्यमेव जयते…बाबा मस्तच”, “ज्ञानदा आणि बाबा किती गोड व्हिडीओ आहे”, “This Is Big Lie हे भारी होतं हा बाबा”, “क्युट फॅमिली” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना १५ मार्चला रविवारी सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल.
