Star Pravah Bai Tujha Ashirvad Promo : ज्या घराला बाईच्या असण्याची सवयच नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि इथूनच सुरू होतो नात्यांचा खरा प्रवास. धनराजशी लग्न झाल्यावर पहिल्याच दिवशी अवनीला तिचं सासरचं घर पाहून धक्का बसणार आहे. हे घर नेमकं कसं आहे पाहुयात…; नुकताच ‘बाई तुझा आशीर्वाद’ या नव्या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सकाळी उठल्यावर ती सर्वप्रथम आपल्या सगळ्यात लहान दीराला भेटते. घरातली टुथपेस्ट संपल्यामुळे धनेश लाटणं घेऊन जुगाड करून टुथपेस्ट वापरत असतो….याचा अर्थ या पुरुषांचं घरात कोणतं सामान आहे आणि कोणतं नाहीये याकडे अजिबात लक्ष नसतं. धनराजचे इतर दोन भाऊ यशोधन आणि धनपाल या दोघांनाही घरातील कोणतीच कामं जमत नसतात. बंद पडलेला फ्रिज आणि त्यात ठेवलेले कपडे, सर्वत्र पसारा असलेलं किचन, बंद पडलेला फॅन आणि सासरेबुवा सकाळी चहाऐवजी दारू पित आहेत हे सगळं पाहून अवनी हैराण होते.
आता या पुरुषांच्या घराला अवनी कसं घरपण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रोमोमधील शेवटचा सीन सर्वांचं लक्ष वेधून घेतो. अवनी वैतागून घराबाहेर निघून जात असते…इतक्यात तिला अंगणात विखुरलेली झाडू दिसते. ही झाडू अवनी उचलते, तिला दोऱ्याने घट्ट बांधून घराची साफसफाई करायचं ठरवते. आता घरातले हे पुरुष अवनीला कशी साथ देणार हा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेत पाहायला मिळेल.
‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा प्रोमो पाहून सर्वांना ‘आम्ही सातपुते’ हा सचिन पिळगांवकरांचा सिनेमा आठवला आहे. तशा कमेंट्सही या प्रोमोवर आल्या आहेत.


दरम्यान, ‘बाई तुझा आशीर्वाद’मध्ये अर्णव वॅरिअर आणि अक्षता प्रमोद यांची फ्रेश जोडी एकत्र झळकणार आहे. याशिवाय या मालिकेत सुनील तावडे, पुष्कर सरद, सतीश तांदळे, राघव वर्तक, सीमा घोगळे अशी दमदार स्टारकास्ट आहे. ही मालिका सुरुवातीला रात्री ९ च्या प्राइम स्लॉटला प्रदर्शित होणार होती. मात्र, त्यानंतर या मालिकेची वेळ लॉन्च आधीच बदलून रात्री १० वाजताची करण्यात आली. आता पुन्हा एकदा या सिरियलची लॉन्च तारीख बदलण्यात आली आहे. येत्या २७ एप्रिलपासून रात्री १० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
