Star Pravah New Serial Bai Tuza Ashirvad Promo : ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेचा दमदार प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ही मालिका सुरुवातीला ३० मार्चला ऑन एअर होईल आणि रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटला प्रसारित केली जाईल असं जाहीर करण्यात आलं होतं. नवीन स्टारकास्ट, हटके कथानक असल्यामुळे सगळेच या मालिकेसाठी उत्सुक होते. पण, ‘बाई तुझा आशीर्वाद’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच ‘स्टार प्रवाह’ने या मालिकेची लॉन्ट डेट आणि वेळ दोन्हीमध्ये बदल केला आहे.
‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका आता रात्री नऊ वाजता नव्हे तर रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० एप्रिलला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित केला जाईल. अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद आणि अभिनेता अर्णव वॅरिअर यांची जोडी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे.
‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेच्या निमित्ताने एक नवा विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास. तिच्या येण्याने घराला घरपण येतं. धनराज आणि अवनी यांची गोष्ट या मालिकेतून सर्वांना पाहायला मिळेल. धनराजचा मोठा भाऊ आहे यशोधन, दुसरा भाऊ धनपाल आणि छोटा आहे भाऊ धनेश.
मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार
अक्षता आणि अर्णव यांच्यासह या मालिकेत सुनील तावडे, पुष्कर सरद, सतीश तांदळे, राघव वर्तक, शरद पोंक्षे, सीमा घोगळे अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. या मालिकेची निर्मिती निखिल शेठ आणि विनोद लव्हेकर यांच्या पोतडी या निर्मिती संस्थेने केली असून विनोद लव्हेकर स्वत: या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. अमोल पाटील या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका २० एप्रिलपासून रात्री १० वाजता प्रसारित होईल. तर, ‘आनंदी’ ही नवीन मालिका ९:३० वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या ‘वचन दिले तू मला’ आणि ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकांबाबत ‘स्टार प्रवाह’ वाहिनी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
