Star Pravah Nashibvan Serial Time Change : गेल्या काही महिन्यांपासून रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटला सर्वाधिक टीआरपी कोणत्या मालिकेला मिळणार यासाठी आघाडीच्या वाहिन्यांमध्ये जोरदार चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात ‘कमळी’ने यात बाजी मारली आहे. ‘कमळी’ मालिकेला गेल्या आठवड्यात सुद्धा आतापर्यंतचा सर्वाधिक टीआरपी मिळाला आहे. त्यामुळे आता ‘स्टार प्रवाह’ने ‘नशीबवान’ मालिकेची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
‘नशीबवान’ मालिका गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारे, अजय पूरकर, नेहा नाईक, प्राजक्ता केळकर, सोनाली खरे अशी जबरदस्त स्टारकास्ट झळकत आहे. रात्री नऊ वाजताच्या प्राइम टाइमला ही मालिका सर्वाधिक टीआरपी आणेल असं बोललं जात होतं. पण, ‘कमळी’ने या सिरियलला जोरदार टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
आता ‘नशीबवान’ मालिकेची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री नऊ वाजता प्रसारित होणारी ‘नशीबवान’ मालिका आता १६ फेब्रुवारीपासून दुपारी प्रसारित होणार आहे. ‘नशीबवान’ला दुपारच्या सत्रात शिफ्ट करण्यात आलं आहे.
‘नशीबवान’ मालिका १६ तारखेपासून दुपारी अडीच वाजता प्रसारित केली जाईल. सध्या स्टार प्रवाहवर दुपारी २:३० वाजता आकाश-भूमीची ‘शुभविवाह’ मालिका प्रक्षेपित केली जात आहे. गेली तीन वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
आता ‘नशीबवान’ अडीच वाजताच्या स्लॉटला शिफ्ट केल्यामुळे ‘शुभविवाह’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, अद्याप स्टार प्रवाह वाहिनीने किंवा शुभविवाहमधील कलाकारांनी मालिका संपणार असल्याची घोषणा केलेली नाहीये.
आता शुभविवाह मालिका खरंच संपणार की याची वेळ बदलली जाणार हे लवकरच स्टार प्रवाह वाहिनीकडून स्पष्ट केलं जाईल. शुभविवाह मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
